पीरबावडा येथे तीन तास रास्तारोको 

नवनाथ इधाटे 
सोमवार, 18 जून 2018

फुलंब्री (औरंगाबाद)- पीरबावडा(ता.फुलंब्री) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा इतरत्र स्थलांतर करू नये यासाठी (ता.18)रोजी सकाळी नऊ वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत फुलंब्री राजूर रोडवर तीन तास रास्तारोको करण्यात आला.

फुलंब्री (औरंगाबाद)- पीरबावडा(ता.फुलंब्री) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा इतरत्र स्थलांतर करू नये यासाठी (ता.18)रोजी सकाळी नऊ वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत फुलंब्री राजूर रोडवर तीन तास रास्तारोको करण्यात आला.

सदरील शाखा ही स्थलांतरित होऊ नये म्हणून पीरबावडासह टाकळी कोलते, रिधोरा, धानोरा, गेवराई, आदी गावातील सेवा संस्था व ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन संबंधित कार्यालयास पाच महिन्यांपूर्वी पत्रव्यवहार केला होता. मात्र पुन्हा बँक स्थलांतरनास गती मिळाल्याने ग्रामस्थांनी पुन्हा (ता.15)रोजी बँक स्थलांतर होऊ नये या मागणीसाठी रास्तारोको करणार असल्याचे निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात परिसरातील सरपंच, उपसरपंच, सेवा संस्थेचे अध्यक्ष,अपंग लाभार्थी, महिला, जिल्हा बँकेचे संचालक पुंडलिक जंगले, देवगिरी कारखान्याचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, जिल्हापरिषद सदस्य किशोर बलांडे, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष डॉ.सारंग गाडेकर,बाजार समितीचे सभापती संदीप बोरसे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे आदींसह शेकडो ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला. यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आमले, वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

लेखी आश्वासन मिळाल्यानंतर घेतले आंदोलन मागे
जोपर्यंत लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत रास्तारोको आंदोलन मागे घेणार नाही अशी ग्रामस्थांनी भूमिका घेतल्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक आमले यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक यशवंत बाविस्कर व उपसरव्यवस्थापक राजेंद्र शिंदे यांनी येऊन सदरील शाखा ही सध्या याच ठिकाणी राहील व सदरील निवेदन हे संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येईल. असे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांच्या हक्काची बँक असून शेतकऱ्यांना सोयीची ठरेल त्याच ठिकाणी बँकेची शाखा असणे गरजेचे आहे. बँक प्रशासनाने पिरबावडा येथील बँक शाखा स्थलांतर करण्याचा पुन्हा निर्णय घेतला. तर हजारो शेतकरी घेऊन अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल
- पुंडलिक जंगले, संचालक, जिल्हा बँक औरंगाबाद

Web Title: Wait three hours at Pirabawada