हिंगोली जिल्ह्यातील १७२ तलावांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा

file photo
file photo
Updated on

हिंगोली : जिल्‍ह्यात पावसाचे आगमन झाले असले तरी जिल्ह्यातील चोवीस लघू तलावांतील पाणीपातळी खालावलेलीच आहे. मेअखेर काही तलावांत चार टक्‍क्‍यांच्‍या आत पाणीसाठा आला असून मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

हिंगोली जिल्‍ह्यात पाटबंधारे विभागाचे एकूण १७२ तलाव आहेत. यात लघुसिंचन, पाझर व गावतलावांचा समावेश आहे. मेअखरेपर्यंत कळमनुरी तालुक्‍यातील तलावात तीन टक्‍के पाणीसाठी होता. 

सिंचनासाठी पाणी उपलब्‍ध

हिंगोली तालुका पाच टक्‍के, सेनगाव चार टक्‍के, वसमत तीन टक्‍के; तर औंढा तालुक्‍यातील तलावात चार टक्‍के पाणीसाठा शिल्‍लक होता. मागील वर्षी झालेल्या शंभर टक्‍के पावसाने लघुतलाव पूर्णपणे भरले होते. त्‍यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्‍ध झाले होते. याचा लाभ भूगर्भातील पाणीपातळीत मोठी वाढ होण्यास झाला होता. 

बाष्पिभवनामुळे पाणीपातळीत घट

मे महिन्यात मात्र वाढता उन्हाचा पारा व बाष्पिभवनामुळे पाणीपातळीत झपाट्याने घट झाली. यामध्ये पारोळा, वडद, चोरजवळा, हिरडी, सवड, पेडगाव, हातगाव, सवना, पिंपरी, बाभूळगाव, घोरदरी, मरसूळ, वाळकी, सुरेगाव, सेंदूरसना, पूरजळ, वंजारवाडी, केळी, कळमनुरी, बोथी, दांडेगाव, देवदरी या तलावांचा समावेश आहे.

कोल्‍हापुरी बंधारे कोरडे पडले

दरम्यान, राजवाडी तलावामध्ये पाच टक्‍के पाणीसाठा उपलब्‍ध असून पिंपळदरी तलावात चार टक्‍के; तर औंढा तलावात वीस टक्‍के पाणीसाठा उपलब्‍ध आहे. याशिवाय चिंचखेडा व खेर्डा कोल्‍हापुरी बंधारे कोरडे पडले आहेत. त्‍यामुळे तलावाच्‍या परिसरातील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. 

मोठ्या पावसाची प्रतीक्षा 

सध्या सिद्धेश्वर धरणात १४.०४ टक्‍के; तर इसापूर धरणात ३३.२७ टक्‍के पाणीसाठा आहे. हिंगोली व वसमत शहराला सिद्धेश्वर धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. या दोन्‍ही शहरांना तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. आता पावसाळा सुरू झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

पाऊस झाल्यावर पाणीपातळीत वाढ होईल

 मेअखेर बहुतांश तलावातील पाणीपातळी उष्णतेमुळे कमी झाली आहे. परंतु, सध्या होत असलेल्या पावसाने दिलासा मिळत असून मोठा पाऊस झाल्यावर या तलावातील पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होईल.
-चंद्रशेखर वाघमारे, कार्यकारी अभियंता
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com