Waluj News : ‘साथ जिएंगे, साथ मरेंगे’; पण वाळूजमध्ये!

‘हमने घर छोड़ा है’ म्हणणाऱ्यांना उद्योगनगरीचा आधार
couple
couplesakal

- भरत गायकवाड

वाळूज - वाळूज म्हणजे कामगारांची वसाहत. गावात रोजगार नसलेल्यांना ही औद्योगिक नगरी जशी ‘आधार’ ठरली; तशीच किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात एकमेकांसाठी स्वतःचा जीव ओवाळून टाकत जन्मभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेणाऱ्या ‘एक दुजे के लिये’साठीही ठरली आहे.

प्रेमासाठी ‘हमने घर छोड़ा है’ म्हणत गाव, आपली माणसं सोडून येणाऱ्या जोडप्यांना एमआयडीसी परिसरातील गावांचा मोठा आधार मिळत आहे. शिवाय रोजगारही मिळत आहे.

वाळूज एमआयडीसीमध्ये मिळणारी रोजगाराची संधी आणि सहज उपलब्ध होणाऱ्या निवाऱ्यामुळे अनेक प्रेमीयुगुल उद्योगनगरीत दिसून येतात. प्रेमासाठी घरातून पळून आलेल्या बहुतांश प्रेमी जोडप्यांनी नातलगांचा ससेमिरा टाळण्यासाठी परिसराचा आश्रय घेतला आहे.

ग्रामीण भागात फारशी रोजगाराची संधी नसल्यामुळे ग्रामीण भागातील अशी प्रेमात पडलेली जोडपी उद्योगनगरीत दाखल होतात. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार दोघेही कारखान्यांमधून काम करतात. यातील अनेक जोडपी अल्पवयीन असल्याने नातलग त्यांच्या शोधात असतात. अशा प्रकरणात पोलिसांकडेही तक्रार केली जाते. त्यातून अनेक प्रेमीयुगुलांना ताब्यात घेऊन नातेवाइकांच्या स्वाधीन केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

या प्रकारामुळे अल्पवयीन असल्याचा संशय येणाऱ्या जोडप्यांना भाड्याने खोली देताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जाते. मात्र, काही नागरिक आपल्याला काय असे म्हणत दुर्लक्ष करतात आणि प्रेमीयुगुलांना किरायाने घर देतात.

मोबाइलमुळे शोधकाम सोपे

नगर भागातील एक पळून आलेल्या एका प्रेमीयुगुलाला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ते वाळूजलगतच्या नवीन शिवराई गावात किरायाने खोली घेऊन राहत होते. या प्रकरणातील मुलगी ही अल्पवयीन होती. नगर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात तिच्या पालकांनी तक्रार दिली होती. यानंतर पोलिस प्रशासनाने मोबाइल लोकेशनवरून त्यांना ताब्यात घेऊन या प्रेमीयुगुलास संबंधित पोलिसांच्या स्वाधीन केले. मोबाइल लोकेशनमुळे हे शोधकाम अगदी सहज सोपे झाले आहे.

घरमालकाला शंका आली

जोगेश्वरी परिसरातील झोपडपट्टीत चाळीसगावातील जोडपे २९ ऑक्टोबरच्यादरम्यान आश्रयास आले होते. त्यांच्या हालचाली काहीशा संशयास्पद वाटल्याने घरमालकासह परिसरातील नागरिकांना शंका आली. त्यांनी या जोडप्याची विचारपूस केली; तेव्हा आम्ही पती-पत्नी असल्याचे सांगून नातलगांना भेटण्यासाठी आल्याचे कारण त्यांनी सांगितले. ते २७ ऑक्टोबरला त्यांच्या गावाकडून जोगेश्वरीत आले होते. ते दोन-तीन दिवस परिसरात राहिले. परंतु, त्यांच्या मोबाइल लोकेशनवरून चाळीसगाव पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला.

‘दे धक्क्या’चे छायाचित्र नको

छोट्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरालगतच्या नगर महामार्गावर एक वाहन मध्येच बंद पडले होते. या वाहनाला धक्का देत असताना एकाने हा प्रसंग मोबाइलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी वाहनाला ‘धक्का’ देणाऱ्यातील एकाने छायाचित्र न घेण्याची विनंती केली.

त्यावर त्याचे कारण विचारले असता त्याने ‘मी घरातून पळून येऊन प्रेमविवाह केला आहे; हे छायाचित्र कोणी पाहिले तर मी पकडल्या जाईन’, असे स्पष्ट सांगितले. असे अनेक प्रेमीयुगुल वाळूज औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून आपले संसार सावरत आहेत.

प्रेमात पळून जाऊन लग्न करण्यापेक्षा युवकवर्गाने संयम बाळगण्याची गरज आहे. या प्रेमीयुगुलांना औद्योगिक वसाहतीतील विविध कारखान्यांमधून कामही मिळते. मजुरी कमी असतानाही या युगलांचा खर्च कमी असल्याने कमी पैशात त्यांचे भागते. आम्हाला घरातून हाकलून दिल्याचे सांगून अशी जोडपी भाड्याने खोल्या मिळवितात.

अशाचप्रकारे वाळूजच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठेनगरात आलेल्या एका युवतीस मागील आठवड्यात तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. युवकाची पोलिसांनी नोंद घेतली. आईवडिलांनीही अशा युवकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे.

- मंगलाबाई काळे, सदस्य, महिला तक्रार निवारण समिती, वाळूज पोलिस ठाणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com