सर्वांना सोबत घ्यायला हवे होते - शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

नांदेड - शिवस्मारकासाठी जल व भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी सर्वांना सोबत घ्यायला हवे होते. मात्र, तसे घडले नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे साऱ्या रयतेचे होते. सध्याच्या राज्यकर्त्यांनी केवळ आपणच त्यांचे वारसदार असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. तो आपल्या बुद्धीला न पटल्याने मुंबईतील या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो नाही, असे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी येथे पुन्हा भाजपवर टीकास्त्र सोडले.

खासदार शेट्टींचा पक्ष हा भाजपचा मित्रपक्ष असला तरी कालच त्यांनी या विषयावर भाजपवर घणाघात केला होता. त्यांनतर त्यांनी आज कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त नांदेड गाठले आणि पत्रकार परिषदेत पुन्हा टीका केली. ते म्हणाले, ""छत्रपती शिवाजी महाराज हे साऱ्या रयतेचे होते. ते आदर्शवत राजे होते. त्यांचे अनुयायी सगळ्याच पक्ष, धर्म, जाती, पंथांत आहेत. त्यामुळे अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी जल व भूमिपूजनाचा कार्यक्रम ही केवळ एका पक्षाची बाब नाही, तो प्रत्येक मराठी माणसाचा अभिमानाचा क्षण आहे. सर्वांना सोबत घेतले असते, तर या कार्यक्रमाचे स्वरूप व्यापक झाले असते.''

Web Title: Wanted to be with them all