बापरे... कापसाची आवक वाढल्याने गोदामांची साठवण क्षमता संपली

राजाभाऊ नगरकर
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

जिंतूरला तीन दिवसांच्या खरेदी केंद्र बंदचा होणार शेतकऱ्यांवर परिणाम

जिंतूर ः चीनमध्ये कापसाची निर्यात होण्यास ‘कोरोना’मुळे अडचणी येत आहेत. ज्यादा कापसामुळे कॉटन कॉपोरेशन ऑफ इंडिया (सीआय) च्या स्थानिक खरेदी केंद्रांवर कापसाची आवक वाढल्याने त्यांच्या गोदामांची साठवण क्षमता संपली. त्यामुळे जिंतूर येथील चारही सीसीआयची खरेदी केंद्र तीन दिवसांकरिता (ता.२१ ते २३) बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

यावर्षी तालुक्यात कापसाचे उत्पादन चांगले झाले आहे. खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी अल्प प्रमाणात सुरू आहे. केंद्र सरकारच्या हमीभावानुसार सीसीआय औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी करीत आहे. सुरवातीला उच्च दर्जाचा कापूस सीसीआयने खरेदी केला. आता ग्रेडमध्ये बदल करून कापूस खरेदी केला जात आहे.

एक लाख एक हजार ३५६ क्विंटल कापूस खरेदी
रमण जिनिंग प्रेसिंग, संतराम ट्रेडिंग कॉटन, विकास उद्योग रमण अग्रो या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र चालू होते. अद्यापपर्यंत या केंद्रांवर ५४ कोटी ७३ लाख २२ हजार रुपये किमतीचा एक लाख एक हजार ३५६ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.

हेही वाचा - महिलांच्या आसनव्यवस्थेसाठी नगरसेवकाचा असाही उपक्रम

प्रतिक्विंटल ज्यादा भाव
राज्य शासनाच्या पणन महासंघ व खासगी व्यापारी यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या भावापेक्षा सीसीआयचा भाव जास्त असून सध्या प्रतिक्विंटल पाच हजार ४५० रुपये या भावाने खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी आणत आहेत. परंतु, सीसीआयने खरेदी केंद्र बंद केली असल्याने शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांशिवाय पर्याय नाही. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन कापूस खरेदी केंद्र लवकर चालू करावेत व कापूस उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा - महाशिवरात्री व्हिडिओ :  शिवालये गजबजली भाविक भक्तांनी

हजारो क्विंटल कापूस शिल्लक
दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी दोन ते अडीच लाख क्विंटल कापूस विक्रीसाठी कमी आला आहे. अनेक शेतकरी, व्यापारी यांच्याकडे अजूनही हजारो क्विंटल कापूस शिल्लक आहे. परंतु, भविष्यात भाव वाढतील या आशेवर अनेकांनी कापसाची साठवणूक करून ठेवली आहे.

तीन दिवस कापूस खरेदी केंद्र बंद
दरम्यान, सीसीआयमार्फत सुरू असलेल्या औद्योगिक वसाहतीमधील कापूस खरेदी केंद्र २१ ते २३ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवणार असल्याचे पत्र सीसीआय मार्फत कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यात आल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या कालावधीत आपला कापूस विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे मुख्य प्रशासक मनोज थिटे, सचिव एस. बी. काळे यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The warehouse storage capacity was depleted due to the increase in the arrival of cotton