पोलिस भरती प्रक्रियेवर सीसीटीव्हीचा वॉच 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

उस्मानाबाद - येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर बुधवारी (ता. 22) पोलिस भरती प्रक्रियेस सुरवात झाली. जिल्ह्यातील 43 जागांसाठी तब्बल पाच हजार तरुणांनी अर्ज केले आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या तरुणांची संख्या मोठी असून पदवीधर अर्जदारांची संख्याही जास्त आहे. यावेळी प्रथमच भरती प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वॉच असणार आहे. 

उस्मानाबाद - येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर बुधवारी (ता. 22) पोलिस भरती प्रक्रियेस सुरवात झाली. जिल्ह्यातील 43 जागांसाठी तब्बल पाच हजार तरुणांनी अर्ज केले आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या तरुणांची संख्या मोठी असून पदवीधर अर्जदारांची संख्याही जास्त आहे. यावेळी प्रथमच भरती प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वॉच असणार आहे. 

पोलिस मुख्यालयाच्या मैदानात भरतीसाठी अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले असून अत्यंत नियोजनबध्द व काटेकोरपणे ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे पोलिस विभागाने सांगितले आहे. उमेदवार मोठ्या संख्येने दाखल झाल्याने सकाळी प्रवेशद्वारात काही काळ गर्दी झाली होती, पण नंतर भरती सुरळीत सुरू झाली. भरतीसाठी उमेदवारांच्या रांगा लावण्यात आल्या होत्या. यावेळी पहिल्यांदाच सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीखाली ही भरती प्रक्रिया होणार आहे. याआधीच्या भरतीवेळी कॅमेरा असायचा पण सीसीटीव्ही कॅमेरा बसविले जात नव्हते. यावेळी मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल असे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातून अनेक तरुण मंगळवारीच रात्री मुक्कामाला आले होते. मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारातून उमेदवारांना सोडण्यास पहाटे पाच वाजता सुरवात झाली. उमेदवारांसोबत आलेल्या लोकांनी गेटच्या बाहेर गर्दी केली होती. पहाटे सुरू झालेली ही भरती प्रक्रिया उन्हाच्या आधी संपविण्याचे नियोजन आहे. आज ज्यांचे उमेदवारी अर्ज घेण्यात आले, त्यांना ओळखपत्र व क्रमांक देण्यात आला असून त्यांची शारीरिक चाचणीही घेण्यात आली. रोज किमान 500 उमेदवारांना बोलावण्यात येणार असून त्यामुळे शारीरिक चाचणीसुध्दा आटोपशीर होणार आहे. शारीरिक चाचणीच्या वेळी मिळणारे गुण लगेचच उमेदवारांना सांगण्यात येत आहेत व प्रत्येक कागदावर त्यांच्या सह्या घेतल्या जात आहेत. त्यामुळे उमेदवारांना भरतीमध्ये किती गुण मिळाले हे लगेच लक्षात येणार आहे. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 गुण घेणाऱ्या उमेदवारांना पुढे लेखी परीक्षेसाठी बोलावले जाणार आहे. या भरती प्रक्रियेकडे स्वतः पोलिस अधीक्षक पंकज देशमुख व अपर पोलिस अधीक्षक दीपाली घाडगे यांचे लक्ष असून ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्याच्या दृष्टीने पोलिस दलाचे प्रयत्न असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

Web Title: Watch CCTV of the police recruitment process