दुष्काळाचा धडा घेत मात्रेवाडीत जलसंधारणाचा वसा

मात्रेवाडी (ता. बदनापूर) येथील नदीवर बांधण्यात आलेला फेरो बंधारा.
मात्रेवाडी (ता. बदनापूर) येथील नदीवर बांधण्यात आलेला फेरो बंधारा.

बदनापूर (जि.जालना) - दुष्काळाचा धडा घेत मात्रेवाडी येथील ग्रामस्थांनी जलसंधारणाचा वसा घेतला. परिणामी नदी खोलीकरणामुळे सिंचनक्षेत्र वाढल्याने अगदी उन्हाळ्यातही मात्रेवाडीकरांना टॅंकरची गरज भासली नाही. गावातील एकजुटीमुळे ऍग्रो कंपनीही स्थापन झाली. विजेचे आकडेमुक्त गाव, शंभर टक्के पीककर्ज वसुलीचे गाव, कृषिपूरक जोड व्यवसायाचे गाव, शुद्ध पाणीपुरवठा करणारे गाव, अशी नवी ओळख आता मात्रेवाडीची झाली आहे. 

मात्रेवाडी अवघ्या 232 उंबऱ्यांचे गाव. शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. गावात 28 कुटुंब भूमिहीन, तर जळपास 80 टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. मात्र, या गावाने 2012च्या दुष्काळापासून धडा घेत बदल घडविण्याचा निश्‍चय केला. सध्या गावातील 80 टक्के शेतकऱ्यांनी 200 एकरांवरील क्षेत्रात "ड्रिप इरिगेशन' केले आहे. ग्रामस्थांनी दुष्काळाशी दोन हात करण्याचा निर्धार करीत भोर्डी नदी व ओढ्यांचे खोलीकरण करण्याचे काम प्रत्यक्षात वर्ष 2015 मध्ये हाती घेतले. त्यास सावित्रीबाई फुले महिला एकात्मिक मंडळ व प्राज फाउंडेशनचे सहकार्य लाभले. एकूणच भोर्डी नदीवर तब्बल 160 घनमीटर खोलीकरणाचे काम झाले आहे. त्यात 11 डोह देखील करण्यात आले. उन्हाळ्यात बहुतांशी गावे टॅंकरची मागणी करीत असताना मात्रेवाडीकर मात्र निर्धास्त होते. केवळ नदी खोलीकरण करून स्वस्थ न बसता जल व्यवस्थापन समिती स्थापन करून पाणी वापराचे नियम केले. यात नदी व ओढ्यातील जलस्रोतात पंप टाकून पाणी उपसाबंदी आहे. शेतात ठिबकचा वापर होतो. भोर्डी नदीत चार सिमेंट बंधारे, चारी खोदणे, बांध बंदिस्ती अशी पाणलोटची कामेही झाली आहेत. सध्या नदी पावसाअभावी कोरडी असली तरी सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीत गावाला पुरेल इतके पाणी आहे. ग्रामपंचायत प्रशासन गावात जलशुद्धीकरण यंत्राचा वापर करीत ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करीत आहेत.

मात्रेवाडीच्या भोर्डी नदीत भारतातला पहिला फेरो बांधराही बांधण्यात आला आहे. मात्रेवाडीसह शेजारील गावातील 313 शेतकऱ्यांनी मिळून भूधन ऍग्रो कंपनी सुरू केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी मार्गदर्शन, त्यांना लागणारी कृषी साधने व शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्रेवाडीच्या सरपंच जानकाबाई डिगंबर खडेकर, उपसरपंच भगवान मात्रे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या एकत्रित सहकार्याने मात्रेवाडीचा कायापालट होत आहे. 

फळबागा, फूलशेतीत वाढ 
एकूणच गावातील सिंचन क्षेत्र वाढले असून 2014 पूर्वी केवळ दोन-तीन फळबागा होत्या. आता 20 एकर द्राक्ष, 20 एकर डाळिंब व 30 एकर मोसंबीच्या फळपिकांनी मात्रेवाडी समृद्ध झाले आहे. शिवाय ग्रामस्थांनी भाजीपाला व फूलशेतीचे उत्पादनही सुरू केले. 

मात्रेवाडी येथे ग्रामस्थ व सेवाभावी संस्थांच्या पुढाकाराने नदी खोलीकरणाचे मोठे काम झाले आहे. शिवाय डोह, फेरो बंधारा व जलव्यवस्थापणाच्या माध्यमातून दुष्काळावर मात करण्यात यश मिळाले आहे. 
- भगवान मात्रे, 
उपसरपंच, मात्रेवाडी. 
------- 
मात्रेवाडी येथील शेतकरी परंपरागत शेती पद्धतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती करीत आहेत. त्यामुळे पिकांच्या उत्पादनवाढीला चालना मिळत आहे. 
- अंकुश मात्रे, 
ग्रामस्थ, मात्रेवाडी. 
------- 
मात्रेवाडी येथील शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाची कास धरली आहे. शेळी, म्हशी व गोपालनाच्या माध्यमातून दुधाचे उत्पन्न वाढले आहे. 
- सखाराम वाघ, 
ग्रामस्थ, मात्रेवाडी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com