तहसीलदारांचा पुढाकार; जलसंधारणाची कामे साकार!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

लोकसहभागाच्या पाठबळातून घनसावंगी, अंबड तालुक्‍यातील 55 गावांत कामे

लोकसहभागाच्या पाठबळातून घनसावंगी, अंबड तालुक्‍यातील 55 गावांत कामे
घनसावंगी (जि. जालना) - शासकीय नोकरीत असूनही लोकाभिमुख भूमिका घेतली तर काय होऊ शकते, याचे प्रत्यंतर जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्‍यात येते. तेथील तहसीलदारांनी पुढाकार घेत ग्रामस्थांना जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले आणि त्यातून त्यांनी जलसंधारणाचा पॅटर्नच तयार केला. त्याला लोकसहभागासह सामाजिक संस्थांचे पाठबळ मिळाले आणि हा हा म्हणता घनसावंगी व अंबत तालुक्‍यातील सुमारे 55 गावांत जलसंधारणाची कामे सुरूही झाली.

कैलास अंडील असे या धडपड्या तहसीलदारांचे नाव आहे. त्यांची घनसावंगीत नियुक्ती आहे. मराठवाड्यात सातत्याने उद्‌भवणाऱ्या दुष्काळातून बोध घेऊन दुष्काळावर मात करण्यासाठी आपल्या भागात काहीतरी करावे, असा विचार त्यांनी गत पावसाळ्यानंतर केला. त्याला मूर्त रूप देण्यासाठी ते कामाला लागले. जलसंधारणाबाबत लोकचळवळ उभारून "टॅंकरमुक्त घनसावंगी', "जलयुक्त घनसावंगी' आदी उद्दिष्टे ठरवली. ती साध्य करण्यासाठी सुरवातीला गावागावांत ग्रामसभा घेतल्या. यात जलयुक्त शिवार समितीचे सदस्य, अन्य तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आदींना सहभागी करून घेतले. जलसंधारणाच्या कामांत लोकसहभागाचे महत्त्व बिंबवण्यात आले. पुढे सर्वसंमतीने ग्राम जलसमिती स्थापन करण्यात आली. अशा समित्यांत गावागावांतील लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी, शेतकरी, माध्यम प्रतिनिधींना सहभागी करून घेतले. म्हणता म्हणता लोकसहभाग सज्ज झाला आणि ही चळवळच झाली. दरम्यान, त्यांनी मुंबईतील जैन समाज संघटना प्रेरित समस्त महाजन ट्रस्टशी संपर्क साधला व या कामांत सहभागाचे आवाहन केले. या ट्रस्टने पोकलेन मशिन उपलब्ध करून दिले. त्याद्वारे अंबड व घनसावंगी तालुक्‍यांतील 55 गावांत गावागावांत नदी- नाले खोलीकरण, रुंदीकरणाची कामे वेगात करण्यात आली. विशेष म्हणजे पोकलेन मशिनला डिझेलसाठी सुमारे एक कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी लोकसहभागातून जमा करण्यात आला. यासाठी काही शेतकऱ्यांनी कापूस दिला. सिंदखेड (ता. घनसावंगी) येथील दिगंबर आधुडे यांनी दीड लाखाची मदत केली.

नदीलगतच्या शेतकऱ्यांनी 75 हजार रुपये जमा करून दिले. आर्थिक स्थिती नसतानाही, कामे सुरूच राहावीत या उद्देशाने शेतालगतच्या शेतकरी, महिलांनी यथाशक्ती आर्थिक मदत गोळा केली. आर्थिक लोकवाट्यासाठी कुणीही विरोध केला नाही, त्यामुळे प्रतिसाद वाढतच गेला. एकीकडे लोकसहभाग चळवळ बळकट होत असताना जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत 28 गावांत पुढील कामे करण्यासाठी 65 लाख रुपयांचा निधी शासनाने दिला. तो महाजन ट्रस्टच्या खात्यांवर वर्ग केला.

श्री. अंडील स्पर्धा परीक्षेनिमित्त गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आहेत. असे असले तरी त्यांनी सुरू केलेल्या चळवळीत खंड पडलेला नाही. येत्या पावसाळ्यात या 55 गावांत या साऱ्या कामाचे फलित दिसेल, असा विश्‍वास त्यांच्यासह ग्रामस्थही व्यक्त करीत आहेत.

महाजन ट्रस्टच्या माध्यमातून अंबाजोगाई (जि. बीड) तालुक्‍यातील 48 गावांत यापूर्वी अशी कामे करण्यात आली होती. त्यानंतर घनसावंगी तालुक्‍यातून सहभागाची विनंती मनावर घेतली. या भागात लोकसहभागातून कामे होत आहेत. शेतकरी समृद्ध व्हावा, हाच त्यामागचा हेतू असल्याचे मत ट्रस्टच्या विश्‍वस्त नूतन देसाई यांनी व्यक्त केले.

Web Title: water conservation work by tahsildar