तुम्ही खुशाल काम करत रहा, पत्नीचा श्रमदानासाठी पाठिंबा 

विकास गाढवे
मंगळवार, 22 मे 2018

लातूर - मुलांच्या परीक्षा सुरू असताना नवरा गावाकडे गेला आणि तिकडेच रमला. साधा फोनही केला नाही. यामुळे राग आलेल्या पत्नीने मुलांना आपल्या आईकडे (आजोळी) "ठेवले त्यानंतर गावाकडे नवऱ्याकडे त्या गेल्या. गावाकडे आपला नवरा वॉटरकप स्पर्धेत श्रमदानाचे काम करत असल्याचे समजल्यावर तिनेही श्रमदान करण्याचे ठरविले. त्याही श्रमदानाच्या कामात एवढ्या रमल्या की आपल्या आईकडे ठेवलेल्या मुलांना त्यांना फोन करता आला नाही.

लातूर - मुलांच्या परीक्षा सुरू असताना नवरा गावाकडे गेला आणि तिकडेच रमला. साधा फोनही केला नाही. यामुळे राग आलेल्या पत्नीने मुलांना आपल्या आईकडे (आजोळी) "ठेवले त्यानंतर गावाकडे नवऱ्याकडे त्या गेल्या. गावाकडे आपला नवरा वॉटरकप स्पर्धेत श्रमदानाचे काम करत असल्याचे समजल्यावर तिनेही श्रमदान करण्याचे ठरविले. त्याही श्रमदानाच्या कामात एवढ्या रमल्या की आपल्या आईकडे ठेवलेल्या मुलांना त्यांना फोन करता आला नाही. आणि जाहिर कार्यक्रमात या पत्निने ''तुम्ही खुशाल काम करत रहा, मी तुम्हाला कधीही काहीही म्हणणार नाही', अशी हमी देऊन 'मीही तुमच्या पावलावर पाऊल ठेऊन काम करणार आहे'', असे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले. 

एकंबीवाडी (ता. औसा) येथे पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेतील गावचे उपसरपंच जीवन चव्हाण व पत्नी अश्विनी चव्हाण या दाम्पत्याचा अनुभव श्रमदानाचा शीण घालवणारा ठरला. ५७९ लोकसंख्या असलेल्या व अवघी अडीचशे हेक्टर जमिनीचे शिवार असलेल्या एकंबीवाडीतील 143 कुटुंबांनी यंदा गाव पाणीदार करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेत उडी घेतली आहे. घराला कुलूप लाऊन अबालवृद्धांसह सर्व ग्रामस्थ आठ एप्रिलपासून दररोज नियमित श्रमदान करत आहेत. 

एकंबीवाडी येथे केवळ दहा टक्के बागायत जमिन असून, उर्वरित जमिन माळरानाची आहे. यामुळे मजुरी करून पोट भरणाऱ्या गावाने डोळ्यात भरणारे काम करून दाखवले आहे. ग्रामस्थांच्या कामाची दखल घेऊन सकाळ माध्यम समुहानेही सकाळ रिलीफ फंडातून दोन लाख रूपये मंजूर करून गावात नाला खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे. ग्रामस्थांनी श्रमदानातून आतापर्यंत दोन हेक्टरवर समपातळीचर, तीन हेक्टरवर सलग समपातळीचर, दहा हेक्टरवर जलशोषकचरर, दोन ईनलेट आउटलेट शेततळे, दोन मातीनाला बांध, शोष खड्डे, रोपवाटीका, एकेवीस दगडी पौळ आदी कामे केली आहेत. यासोबत दोन पाझरतलावातील तीस हजार घनमीटर गाळही काढला आहे. स्पर्धेसाठी असलेल्या निकषाच्या पुढे जाऊन काम झाले आहे. उपसरपंच चव्हाण यांनी ग्रामस्थांसोबत श्रमदानासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांचे कुटुंब मुलांच्या शिक्षणासाठी लातूरला आहे. 

या वेळी उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार अहिल्या गाठाळ, गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

गुरूजींची सुट्टीला सुट्टी
शाळांना सुट्ट्या लागल्या की बहुतांश शिक्षक आपल्या गावाकडे निघून जातात. एकंबीवाडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक तानाजी हजारे हे मात्र, त्यासाठी अपवाद ठरले आहेत. श्रमदानाने गाव भारावून गेले असताना त्यांनी सुट्टीला सुट्टी देऊन ग्रामस्थांसोबत श्रमदानात सहभाग घेतला. श्री. हजारे यांच्या योगदानाचे अधिकारी व ग्रामस्थांना मोठे अप्रुप आहे.

Web Title: water cup tournament shramadan