‘जार’चा गोरखधंदा

माधव इतबारे
रविवार, 26 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - गेल्या काही वर्षांपासून पाण्यासाठी शहरातील नागरिकांच्या घशाला कोरड पडलेली असताना दुसरीकडे महापालिकेचे पाणी चोरून त्यावर जारचा व्यवसाय केला जात असल्याचा प्रकार ‘सकाळ’च्या ‘स्टिंग ऑपरेशन’मधून समोर आला आहे. कोटला कॉलनी येथील टॅंकर भरण्याच्या पंपावरून जारच्या रिक्षा भरून पाणी पळविले जात आहे. दिवसाढवळ्या हा प्रकार सुरू असल्याने महापालिका अधिकाऱ्यांचाच जार विक्रेत्यांना आशीर्वाद असल्याची चर्चा दबक्‍या आवाजात सुरू आहे.

औरंगाबाद - गेल्या काही वर्षांपासून पाण्यासाठी शहरातील नागरिकांच्या घशाला कोरड पडलेली असताना दुसरीकडे महापालिकेचे पाणी चोरून त्यावर जारचा व्यवसाय केला जात असल्याचा प्रकार ‘सकाळ’च्या ‘स्टिंग ऑपरेशन’मधून समोर आला आहे. कोटला कॉलनी येथील टॅंकर भरण्याच्या पंपावरून जारच्या रिक्षा भरून पाणी पळविले जात आहे. दिवसाढवळ्या हा प्रकार सुरू असल्याने महापालिका अधिकाऱ्यांचाच जार विक्रेत्यांना आशीर्वाद असल्याची चर्चा दबक्‍या आवाजात सुरू आहे.

शहरातील पाण्याचे वेळापत्रक काही वर्षांपासून कोलमडले आहे. समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने काही भागांत एक दिवसाआड पाणी देण्याचा प्रयोग यशस्वी केला होता. दरम्यान या कंपनीचा करार रद्द करण्यात आला व महापालिका प्रशासनाने पुन्हा पाणीपुरवठा योजना ताब्यात घेतली.

तेव्हापासून पाण्यासाठी नागरिकांचे हाल सुरू आहेत. सर्व भागाला समान पाणी देण्याच्या नावाखाली उन्हाळ्यात भाजप नगरसेवकांच्या आंदोलनानंतर तत्कालीन प्रभारी आयुक्तांनी तीन दिवसांआड पाणी देण्याचे वेळापत्रक तयार केले. त्याला विरोध करीत महापौर व स्थायी समिती सभापतींनी पुन्हा दोन दिवसांआड पाणी देण्यास भाग पाडले. त्यावर कुरघोडी करीत भाजप नगरसेवकांनी ठराविक वॉर्डांनाच दोन दिवसांआड पाणी मिळत असल्याचा आरोप केला आणि आयुक्तांची भेट घेत तीन दिवसांआडच पाणी देण्याचा आग्रह धरला. सध्या शहराला तीन दिवसांआड पाणी देण्यात येत असल्याचे कागदोपत्री वेळापत्रक आहे. प्रत्यक्षात मात्र चार-पाच दिवसांआड नागरिकांना पाणी मिळत आहे. पाण्यावरून एकीकडे राजकारण सुरू असताना दुसरीकडे महापालिकेचे पाणी चोरून जारचा व्यवसाय केला जात असल्याचे समोर आले आहे. कोटला कॉलनी येथील टॅंकरच्या पंपावर ‘सकाळ’ने ‘स्टिंग ऑपरेशन’ केले असता, दोघांनी एका रिक्षामध्ये पंधरा ते वीस जार भरून पाणी घेतले. विशेष म्हणजे, त्यांना कोणीच हटकले नाही. या रिक्षावर जार विक्री करणाऱ्याचे नावदेखील होते.

केवळ एकावर गुन्हा दाखल 
शहरात जारच्या पाण्याचा व्यवसाय करणारे अडीचशे ते तीनशे जण आहेत. तत्कालीन आयुक्त नाल्याची पाहणी करण्यासाठी गेले असता एका ठिकाणी बेकायदा नळ घेऊन एकजण जारचा व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी आयुक्तांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

पाण्याचा हिशेब  
 पाण्याचा दररोजचा उपसा - 145 एमएलडी 
 प्रक्रियेनंतर शहरात येते पाणी - 115 एमएलडी 
 पाण्याची दररोजची गरज - 134 एमएलडी 

वाहनाचा क्रमांक केला पुसट
ज्या वाहनातून पाणी चोरी केली जाते त्या वाहनाची ओळख पटू नये, यासाठी वाहनचालकाने वाहनाचा क्रमांक खोडून पुसट केला आहे. त्यामुळे जर कुणी याविषयी महापालिकेला माहिती दिलीच, तर कारवाई करण्यासाठी वाहन सापडू नये, यासाठी ही खबरदारी घेतल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत आढळून आले.

Web Title: Water Jar Illegal Business