पाच हजार 240 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

पैठण (जि.औरंगाबाद) : ""जायकवाडी धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे धरणाच्या उघडण्यात आलेल्या दरवाजांची संख्याही कमी करण्यात आली असून, आता सोळापैकी दहा दरवाजांतून गोदापात्रात पाच हजार 240 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे,'' अशी माहिती धरण सहायक अभियंता संदीप राठोड यांनी रविवारी (ता. 29) दिली.

पैठण (जि.औरंगाबाद) : ""जायकवाडी धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे धरणाच्या उघडण्यात आलेल्या दरवाजांची संख्याही कमी करण्यात आली असून, आता सोळापैकी दहा दरवाजांतून गोदापात्रात पाच हजार 240 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे,'' अशी माहिती धरण सहायक अभियंता संदीप राठोड यांनी रविवारी (ता. 29) दिली.

धरणात पाणलोट क्षेत्रातून एकूण दहा हजार क्‍युसेक पाणी येण्याचे प्रमाण सुरू आहे. रात्रीतून हे प्रमाणही कमी होण्याची शक्‍यता आहे. गोदापात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्यात धरणावरील जलविद्युत निर्मिती केंद्रातून एक हजार 549 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. तसेच धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपातळीची धरण नियंत्रण कक्षात नोंद घेतली जात आहे. मागील आठवड्यात नाशिक, नगर जिल्ह्यांत झालेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणी दाखल झाल्याने ता. 15 सप्टेंबर 2019 पासून पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आली आहे. अद्यापही पाणी सोडणे सुरूच आहे.

येत्या काळात पुन्हा जर धरणात पाणी वाढले तर पाणी सोडले जाणार असून, जलसंपदा विभागाची यंत्रणा यासाठी 24 तास सतर्क ठेवण्याचे आदेश गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोईरकर यांनी दिले आहेत. दैनंदिन गोदापात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा अहवालही वरिष्ठांना पाठविण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील पावसाचा अंदाज व गोदावरी नदीच्या पूरपरिस्थितीची माहिती तेथील जलसंपदा विभागाच्या यंत्रणेशी संपर्क ठेवून घेतली जात आहे.

गोदावरीची स्वच्छता, पैठणकरांना आनंद
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून गोदावरी नदीच्या पात्रात वाहून जाणारे पाणी कधीच दिसले नव्हते. त्यामुळे गोदावरीच्या पात्रात घाणीचे साम्राज्य पसरले होते. परिणामी दुर्गंधी पसरल्याने नागरिक व भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. परंतु आता तब्बल एक महिन्यापासून मोठा पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत होत असल्यामुळे व संपूर्ण घाण स्वच्छ होत असल्याने पैठणकरांत आनंद पसरला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Releases Into Govdavari River