कालव्याच्या पाण्याने भरलेय गोदावरी पात्र 

चक्रधर नाटकर
Friday, 22 May 2020

गोदावरी आता दुथडी भरल्याने साहजिकच नदीपात्राच्या लगत असलेल्या शेतशिवारातील विहिरींसह कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील ऊस, मोसंबी, केळी, पपई आदी फळबागांनाही जीवदान मिळेल. 

शहागड (जि.जालना) - जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून पाणी आल्याने सध्या अंबड तालुक्यातील शहागड येथील गोदावरी नदीपात्र दुथडी भरले आहे. दरम्यान, शहागडच्या बंधाऱ्यातून पाथरवाल्याच्या बंधाऱ्यासाठी गुरुवारी (ता.२१) पाणी सोडण्यात आले आहे. 

गोदावरी नदीकाठच्या शहागडसह बळेगाव, आपेगाव, साष्टपिंपळगाव, वाळकेश्र्वर, कुरण, पाथरवाला आदी भागात पाणीप्रश्‍नाला ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत होते. शिवाय अनेक पाणी योजनेच्या विहिरीही तळाला गेलेल्या होत्या.

हेही वाचा :  जालन्यातील शेतकऱ्यांना घरपोच खते 

त्यामुळे गोदाकाठावरील गावांतील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याबाबत पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी केलेली होती. त्यामुळे श्री.टोपे यांनी संबंधित विभागाला याबाबत सूचना दिल्या होत्या.

हेही वाचा : गोदेत पाणी येण्यापूर्वीच माफियांनी धुतले वाळूने हात

आता गोदापात्रात पाणी आल्याने आता शहागडसह बळेगाव, आपेगाव, साष्टपिंपळगाव, डोमलगाव, गोरी, गांधारी, वाळकेश्र्वर, कुरण, पाथरवाला तसेच गेवराई तालुक्यातील पांचाळेश्वर, डाके पिंपळगाव, राक्षसभुवन, सावळेश्वर, खामगाव, नांदर, संगम जळगाव, हिंगणगाव यासह वीस ते तीस गावांतील ग्रामस्थ, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या भागातील महत्त्वाचा असा पाणीप्रश्‍न सुटण्यास मदत होईल, शिवाय शेतीलाही लाभ होणार आहे. 

फळबागासह उसाला जीवदान 

गोदावरी आता दुथडी भरल्याने साहजिकच नदीपात्राच्या लगत असलेल्या शेतशिवारातील विहिरींसह कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील ऊस, मोसंबी, केळी, पपई आदी फळबागांनाही जीवदान मिळेल. 

खरीप हंगामाला आधार 

खरीप हंगामातील कपाशी, बाजरी, मूग, तूर, सोयाबीन या पिकांच्या पेरणीसाठी व लागवडीसाठी परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होईल. पावसाला सुरवात होईपर्यंत कपाशीची लागवडही शेतकऱ्यांना करता येणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water reserves in Godavari river