गोदेत पाणी येण्यापूर्वीच माफियांनी धुतले वाळूने हात 

दिलीप पवार 
Friday, 22 May 2020

शहागडच्या बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने वाळू उपसा करता येणार नाही म्हणून गुरुवारी दुपारीच माफियांनी लगबग केली. पाणी येण्यापूर्वी जितका शक्य तितका वाळू उपसा सुरू केला.

 अंकुशनगर (जि.जालना) -  शहागडच्या बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे कुरणच्या नदीपात्रात माफियांनी गर्दी करीत पाणी येण्यापूर्वीच वाळूने हात धुतले. विशेष म्हणजे युद्धपातळीवर उपसा करीत ठिकठिकाणी वाळूचे साठे करूनही ठेवले. 

कोरोनाचे संकट व लॉकडाउनमुळे महसूल तसेच पोलिस प्रशासन कर्तव्यात व्यस्त असल्याचे पाहून वाळूमाफिया सक्रिय झाले आहेत. त्यातच शहागडच्या बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने वाळू उपसा करता येणार नाही म्हणून गुरुवारी दुपारीच माफियांनी लगबग केली.

हेही वाचा : कोरोनाशी मुकाबल्यासोबत गुन्हेगारांचा बीमोड 

पाणी येण्यापूर्वी जितका शक्य तितका वाळू उपसा सुरू केला. त्यामुळे गोदापात्रात दोन लोडर, अनेक ट्रॅक्टरसह माफियांची गर्दी झाली होती.

हेही वाचा : दीड वर्षाच्या चिमुकलीला घरी ठेवत ‘त्या’ कर्तव्यावर

सध्या वाळूचे भावही वधारले आहेत. त्यामुळे नदीच्या काठावरही वाळूचा साठा ठिकठिकाणी करण्यात आला. ऑर्डर येईल त्याप्रमाणे वाहतूक करून चोरट्या पद्धतीने विक्री सुरू केली आहे. 

साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोनजण ताब्यात 

गोदावरी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर गोंदी पोलिसांनी मंगळवारी (ता.१९) रात्री कारवाई केली आहे. या कारवाईत ट्रॅक्टरसह साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. गोंदी पोलिस ठाण्यात नवीनच रुजू झालेले सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद बोडले, पोलिस उपनिरीक्षक गजानन कोळासे, गोपनीय शाखेचे महेश तोटे, अभिजित निकम यांनी फौजफाट्यासह गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध रात्रभर मोहीम उघडली होती. या कारवाईत मंगरूळ येथील नदीपात्रातून दोन ट्रॉली असलेले वाळू भरलेले एक ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले. त्यानंतर पाथरवाला येथील नदीपात्रात पोलिसांना पाहून वाळू भरत असलेले ट्रॅक्टर सोडून चालक आणि इतर काहीजण पळून गेले. पोलिसांनी दोन ट्रॉली असलेले वाळूने भरलेले एक ट्रॅक्टर आणि एक रिकामे ट्रॅक्टर असे दोन ट्रॅक्टर व वाळू असा एकूण ९ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित दोघांना ताब्यात घेतले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sand smuggling in Godavari river