पाणी, रस्ते, कचरा प्रश्‍नाला देणार प्राधान्य - अतुल सावे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जून 2019

मंत्रिपदाची शपथ घेताच पाणीप्रश्‍न मांडला
मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर घरी जाण्यापूर्वी आपण नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेतली. त्यांना औरंगाबादच्या पाण्याची समस्या सांगून हा प्रश्‍न महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत सोडवावा, असे सांगितले. यासाठी दीडशे कोटींचा विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करण्यासही सांगितले असून, तो प्रस्ताव पाठविण्यास संबंधितास सांगितले, अशी माहितीही श्री. सावे यांनी दिली.

औरंगाबाद - सध्या शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासोबतच औद्योगिक वसाहतींनाही पाणी मिळायला हवे, यासह कचरा व रस्त्याच्या कामांना प्राधान्य देत आहे. ज्या धरणावर औरंगाबाद, जालन्यासह अन्य गावे, शहरे व उद्योगधंदे अवलंबून आहेत, अशा जायकवाडी धरणातील गाळ अनेक वर्षांपासून काढण्यात आलेला नाही. 

याप्रश्‍नी तीन दिवसांपूर्वीच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली असून, गाळ काढण्याबाबत पत्र दिले आहे. याचा पाठपुरावा करणार असल्याचे उद्योग, खनिकर्म, अल्पसंख्याक राज्यमंत्री अतुल सावे यांनी सांगितले. 

शनिवारी (ता. २९) श्री. सावे यांनी ‘सकाळ’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीचे संपादक संजय वरकड यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर संपादकीय सहकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. श्री. सावे म्हणाले, ‘‘शहरातील प्रलंबित प्रश्‍नांसोबतच कौशल्य विकास, अल्पसंख्याकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती घेत आहे. आमचा कार्यकाळ हा ट्वेंटी-ट्वेंटी मॅचसारखा असला तरी खूप काही करता येणार आहे. औरंगाबादेत दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आलेला आहे. आणखी नवीन कुठले उद्योग आणता येतील, यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच येथील उद्योगधंद्यांच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, हादेखील त्यामागचा प्रयत्न आहे. शहरात अल्पसंख्याकांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रयत्न करणार आहे.’’

घाटीतील प्रश्‍न मार्गी लावू
घाटी रुग्णालयाच्या अभ्यागत समितीचा अध्यक्ष या नात्याने येथील सुपर स्पेशालिटी विंग सुरू करण्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ, फिजिओथेरपी व ऑक्‍युपेशनल थेरपी महाविद्यालयाला मंजुरी, राज्य कर्करोग रुग्णालयाच्या बांधकामाला सुरवात करण्यासाठी प्रयत्न, तसेच संरक्षक भिंत, रस्ते व ड्रेनेजलाइन या कामांसाठी आवश्‍यक निधीसाठी पाठपुरावा करणार आहे, असे श्री. सावे म्हणाले.

भाजपचा नव्हे, युतीचाच मंत्री
मी भाजपचा आमदार असलो तरी आता युतीचा मंत्री आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जिल्ह्यात नऊही मतदारसंघांत युतीचेच उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेन. पूर्वमध्ये आता धोका निर्माण झाल्याबाबत विचारले असता, आपण आता मंत्री झालोत. रोज नवीन माणसे जोडत आहे. भाजपची संघटनात्मक बांधणी ही शेवटच्या माणसांपर्यंत असते. त्यामुळे काही अडचण नाही, असेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Road garbage Issue Priority Atul Save