पाणीच नाही, देणार कुठून?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद - सध्या शहरात उपलब्ध असलेल्या पाण्यामध्ये नागरिकांची तहान भागविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात नव्या भागामध्ये पाइपलाइन टाकण्यासाठी दबाव येत आहे. पाणीच नाही, तर देणार कुठून? असा प्रश्‍न पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी सोमवारी (ता. २२) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केला. 

पाणीप्रश्‍नावरून दोन दिवसांपूर्वी सर्वसाधारण सभेत नगरसेवक संतप्त झाले होते. त्यानंतर सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत पाण्याचा प्रश्‍न स्वाती नागरे, गजानन बारवाल, रूपचंद वाघमारे यांनी उपस्थित केला. नागरिक कर भरतात, मग त्या भागात पाणीपुरवठ्याची कामे का केली जात नाहीत? असा प्रश्‍न वाघमारे यांनी केला. नागरे यांनी सिडको-हडको भागाला मागणीच्या प्रमाणात किती पाणी दिले जाते, याची माहिती देण्याची मागणी केली. त्यावर कार्यकारी अभियंता कोल्हे यांनी स्पष्ट सांगितले, की ‘नो नेटवर्क’ भागात म्हणजे ज्या भागात पाइपलाइन नाही, तिथे पाणी देण्यासाठी दबाव टाकला जात आहे; मात्र सध्या उपलब्ध पाण्यात नागरिकांची तहान भागविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नव्या योजनेनंतरच इतर ठिकाणी पाणी देणे शक्‍य आहे, असे कोल्हे यांनी नमूद केले. त्यावर सभापतीने तुमच्याकडून असे उत्तर अपेक्षित नाही, तोडगा काढून सर्वांना पाणी मिळेल, यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना केल्या.

३८ वसाहतींना दिले पाणी 
जायकवाडीतून येणारे पाणी व गरज लक्षात घेता मोठी तूट आहे. त्यात वारंवार वीजपुरवठ्यामुळे व्यत्यय येतो. असे असताना शहरातील सुमारे ३८ वसाहतींत पाइपलाइन टाकून पाणी देण्यात आले. त्यामुळे ताण वाढला असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. 

अनेक ठिकाणी तासन्‌तास पाणी 
काही भागांमध्ये दोन ते अडीच तास पाणी सुरू राहते, अशी तक्रार सदस्यांनी केली. त्यावर त्या भागाचे नाव सांगा, कारवाई करतो, असे कोल्हे म्हणाले.

Web Title: water shortage