पाणीटंचाईचे चटके सुरू!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद जिल्ह्यात 47 टॅंकर ः तब्बल एक लाख लोकसंख्येला फटका; गंगापूर तालुक्‍याला सर्वाधिक झळा

औरंगाबाद - जिल्ह्यात फेब्रुवारीच्या सुरवातीला पाणीटंचाईचे चटके जाणवण्यास सुरवात झाली आहे. सध्या जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांतील 42 गावे आणि एका वाडीला 47 टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये सतत अवर्षणग्रस्त असलेल्या गंगापूर, वैजापूर तालुक्‍यांत सर्वाधिक 36 टॅंकर सुरू आहेत. चार तालुक्‍यांतील 96 हजार 959 लोकसंख्येला सध्या टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

गेल्यावर्षी जिल्ह्यात दुष्काळाने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. यंदा पाऊस चांगला झालेला असला तरी गंगापूर, वैजापूर तालुक्‍यांमध्ये टंचाईची समस्या जाणवण्यास सुरवात झाली आहे. सध्या गंगापूर तालुक्‍यातील 26 गावांना 29 टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यानंतर वैजापूर तालुक्‍यातील दहा गावांत 10 टॅंकर सुरू आहेत. या गावांना एका दिवसासाठी टॅंकरच्या 98 खेपा मंजूर असून, प्रत्यक्षात 92 खेपा झाल्या आहेत. येथे पाणीपुरवठ्यासाठी शासकीय 19, तर खासगी 28 टॅंकरचा वापर करण्यात येत आहे. 42 गावांना पाणीपुरवठ्यासाठी 29 विहिरींचे अधिग्रहण झाले आहे.

गंगापूर तालुक्‍यात तांदुळवाडी, बोलठाण, शहापूर, शिल्लेगाव, घोडेगाव, वडगाव, टोकी इब्राहिमपूर, सिरेसायगाव-गोपाळवाडी, सावंगी, हर्सूल, अनंतपूर, दायगाव, सिरेगाव, सिद्धनाथ वाडगाव, मालुंजा खुर्द, हदियाबाद, मालुंज बु., कोळघर, वडाळी-मेंढी, कनकोरी, गवळीधानोरा, भालाव अशा गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

टॅंकर सुरू असलेले तालुके
तालुके...............गावे........................टॅंकर
गंगापूर................26.......................29
वैजापूर.................10..................... 10
सिल्लोड...............03..................... 05
कन्नड.................03....................... 02
खुलताबाद........... 01 (वाडी)................ 01

Web Title: Water shortage