औरंगाबाद : ऐन पावसाळ्यातही 11 दिवस ठणठणाट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

नाथसागरातील पाणी पातळी झपाट्याने वाढत असताना शहरातील पाणी टंचाई मात्र दूर झालेली नाही. सिडकोसह म्हाडा कॉलनी, विठ्ठलनगर भागात गेल्या 11
दिवसांपासून पाणी नाही. गेल्या आठवड्यात दोन रोहित्र जळाल्यामुळे एक पंप बंद असून, अद्याप त्याची दुरुस्ती झालेली नाही. शहरात पाणीच कमी येत असल्यामुळे आम्ही काय करणार, अशी हतबलता पाणी पुरवठा विभागातील अधिकारी दाखवित आहेत. 

औरंगाबाद - नाथसागरातील पाणी पातळी झपाट्याने वाढत असताना शहरातील पाणी टंचाई मात्र दूर झालेली नाही. सिडकोसह म्हाडा कॉलनी, विठ्ठलनगर भागात गेल्या 11
दिवसांपासून पाणी नाही. गेल्या आठवड्यात दोन रोहित्र जळाल्यामुळे एक पंप बंद असून, अद्याप त्याची दुरुस्ती झालेली नाही. शहरात पाणीच कमी येत असल्यामुळे आम्ही काय करणार, अशी हतबलता पाणी पुरवठा विभागातील अधिकारी दाखवित आहेत. 

भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. अनेक भागात आठ-दहा दिवसानंतर नळाला पाणी आल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर उतरून अनेकवेळा आंदोलने केली. दरम्यान पावसाळा सुरू झाल्यानंतर तरी पाणी टंचाईची तीव्रता कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. समान पाणी देण्याच्या नावाखाली गारखेडा, शिवाजीनगर, उल्कानगरीसह इतर भागात पाणी कपात करण्यात आली. त्यानंतर काही दिवस सिडको-हडको भागात चार दिवसाआड पाणी आले. मात्र, सध्या गेल्या 11 दिवसांपासून अनेक भागात नळाला पाणी आलेले नाही. म्हाडा कॉलनी, विठ्ठलनगर भागात आज 11 व्या दिवशीही पाणी आले नसल्याचे नगरसेवक मनोज गांगवे यांनी सांगितले.

तसेच पॉवरलूम उत्तरानगरी भागात नवव्या दिवशी, मुकुंदवाडी, रामनगर भागात आठव्या दिवशी देखील पाणी आले नसल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. गेल्या आठवड्यात 30 जुलैला फारोळा येथे रोहित्र जळाले होते. त्यामुळे एक पंप बंद पडला असून, सध्या चार पंपांद्वारे केवळ 100 एमएलडी पाणी शहराला येत आहे. हे पाणी कमी पडत असून, सिडकोतील टाक्‍यावर पाणीच येत नसल्यामुळे गॅप वाढल्याचे उपअभियंता आर. एन. संधा यांनी सांगितले. 
 

रोहित्र जळाल्यामुळे फारोळा येथील एक पंप बंद आहे. रोहित्र कंपनीकडे दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले आहेत. कंपनीने किमान 12 दिवस लागतील असे सांगितले. त्यामुळे इतर पर्यायांचा शोध सध्या सुरू आहे. एक पंप बंद असल्यामुळे पाणी उपशात घट झाली आहे.  
- बी. डी. घुले, उपअभियंता यांत्रिकी विभाग. 
 
गेल्या नऊ दिवसांपासून वॉर्डात पाणी नाही. संबंधित अधिकाऱ्यांना माहिती घेण्यासाठी फोन केला असता, एकही अधिकारी फोन उचलत नाही. महिला नगरसेविका असल्यामुळे
कोणत्याही कामासाठी पुढाकार घेतला जात नाही.'' 
-सुरेखा सानप, नगरसेविका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water shortage in Aurangabad city