हिंगोली जिल्ह्यात २७ पैकी तीन तलाव जोत्याखाली; तेरा तलावांत पाणीसाठा २५ टक्क्यांपर्यंतच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water lake

हिंगोली जिल्ह्यात २७ पैकी तीन तलाव जोत्याखाली आले असून, १३ तलावांचा पाणीसाठा २५ टक्क्यांपर्यंत आल्याने पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Water Shortage : हिंगोली जिल्ह्यात २७ पैकी तीन तलाव जोत्याखाली; तेरा तलावांत पाणीसाठा २५ टक्क्यांपर्यंतच

हिंगोली - जिल्ह्यात २७ पैकी तीन तलाव जोत्याखाली आले असून, १३ तलावांचा पाणीसाठा २५ टक्क्यांपर्यंत आल्याने पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्ह्यात पाटबंधारे विभागाचे एकूण २७ तलाव आहेत. गतवर्षी पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्यामुळे तलावातील पाणीसाठा जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत टिकून होता. यामुळे हरभरा, गहू पिकांना पाणी देता आले तर जनावरांनाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले होते. आता तलावातील पाणीसाठा आटण्यास सुरवात झाली आहे.

हिंगोली तालुक्यातील वडद, हिरडी, पेडगाव या तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली आला आहे. तर, १३ तलावांमध्ये २५ टक्केपर्यंतच पाणीसाठा आहे. यामध्ये पारोळा २३.४५ टक्के, चोरजवळा १९, हातगाव २३, नवलगव्हाण २०, सवना २०, पिंपरी ५, पुरजळ १८, वंजारवाडी १९, काकडदाभा २३, केळी १४ तर देवधरी तलावात २० टक्के पाणीसाठा आहे.

या सोबतच ११ तलावांमध्ये २५ ते ५० टक्केपर्यंत पाणीसाठा असून, यामध्ये सवड २९, बाभूळगाव २५ घोडदरी ४९, वाळकी ४४, सुरेगाव ३४, औंढा नागनाथ ४४, पिंपळदरी ४०, कळमनुरी २८, बोथी ३७, दांडेगाव ३८ तर राजवाडी तलावात ४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

तसेच जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणामध्ये ७४ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणामध्ये ६८ टक्के पाणीसाठा आहे. सिद्धेश्वर धरणावर हिंगोली शहरासह २० गाव पुरजळ, २३ गाव सिद्धेश्वर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. धरणात पाणी असल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

टॅग्स :HingoliwaterMarathwada