गव्हाण रिकामी, दूध झालं कमी

औरंगाबाद - थोडा का होईना आपल्यापुढं चारा पडंल, या आशेवर अर्धपोटी राहणाऱ्या आडगाव इथल्या गोठ्यातील या मुक्‍या जिवांप्रमाणे साऱ्याच पशुधनाचे यंदाच्या दुष्काळात हाल सुरू आहेत.
औरंगाबाद - थोडा का होईना आपल्यापुढं चारा पडंल, या आशेवर अर्धपोटी राहणाऱ्या आडगाव इथल्या गोठ्यातील या मुक्‍या जिवांप्रमाणे साऱ्याच पशुधनाचे यंदाच्या दुष्काळात हाल सुरू आहेत.

औरंगाबाद - आधीच डोंगराळ भाग... खडकाळ जमीन यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय केला; पण यंदा पाऊस एवढा कमी झाला, की जनावरांच्या चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती झाली. जनावरांना पोटभर चारा मिळंना, गव्हाणीत चाराच नसल्यानं अक्षरश: गव्हाण रिकामी पडलेली... जनावरांची पोटं खोल गेलेली... हिरवा चारा नाही. त्यामुळं त्यांचा खुराक वाढला. रोज दोन टाईम ११-१२ लिटर दूध देणारी म्हैस आता ८-९ लिटरवर आली. फार फार आता महिना-पंधरा दिवस पुरंल इतकंच पाणी आहे. पुढं काय करायचं? असा प्रश्‍न पशुपालक शेतकऱ्यांपुढं पडलाय. 

अडगावचे दादाराव हरिश्‍चंद्र पठाडे हतबल होऊन सांगत होते, ‘लै परेशानी हाय सद्या, लै त लै बारा ते पंदरा दिवस पानी राईन आमाला इतं. जवळ तं पानीच नै मग तळ्यालाबी यावर्सी पानी कमीच है. निसतं गाळ असतो तळ्यामदीबी. इतं गावाजवळ हाय तळं. जवर हाय तवर. नायतर टॅंकरनं आणावं लागन. चाऱ्याचं एक टॅक्‍टर ८ ते ९ हजाराला आमाला पडल आन एक टॅक्‍टर आट ते धा दिवस पुरतं येवड्या जनावरायला. खायला जास्त लागतंना, १७-१८ मोठी जनावरं हायत अन्‌ बकऱ्याबी हायत. मोठायला म्हशी हायत. त्यांच्या गव्हाणीतसुद्ध काईच नाही, ऱ्हातच नै. जेवडं टाकंल तेवडं खातच ऱ्हातंय ते. सगळी जनवरं दुभती हायतं. तेवडं पोटबर तर आपणबी पुरवू शकत नै सद्या तर. अन्‌ चारा जवळपास भेटतबी नै. हिरवा चारा असल्यामुळं खर्च कमी यायचा, खुराक कमी दिला तरी दूध वेवस्तित द्यायचे; पण आता हिरवा तर नैच. वाळेलपण कमीचै. तर त्येच्यामुळं खुराक वाडवावी लागली. खुराक जवळपास डबलच वाडवावी लागली. डबल वाडवल्याशिवाय ते दूध देऊच शकत नैत. ज्यावेळंस हिरवा चारा व्हता तवा हे जनावरं ११-१२ लिटर आरामशीर दूध द्यायचे; पण आता ते ८-९ वर आलेलै. आता गव्हाणीत काईच नै. संध्याकाळी थोडं थोडं टाकणार अन्‌ ते त्येच खाणार,’ असं सांगताना हताशपणा लपवण्याचा प्रयत्न करत होते. 

याच गावचे भागीनाथ पठाडे सांगतात होते, ‘‘पैसा-दोन पैसा संसाराच्या गाठीला कामी येण्यासाठी शेतीला पशुपालनाचा जोडधंदा. ह्यावर्षी पाऊस कमी आहे अन्‌ शेतीतून जी काय चारा उत्पादन होतं ते झालं नाही. आताच आमी चारा विकतच आणलाय. काई अकोल्याहून, काई जालन्याहून आणलाय. मक्‍याचा चारा आणून त्याची कुट्टी बनवून जनावरांचं कसंतरी वेवस्तापन करतो. एकदा जनावर हातचं निगून गेलं की पुन्हा आमच्याकून जनावरंसुद्दा होणार नाही सायेब इवडी परिस्थिती बिकट आहे. आमच्या लेकराबाळायच्या खरचाचा पैसा लेकराबाळायच्या ऐवजी जनावरांसाठी खर्च करतोय. आमची सरकारकडं हात जोडून विनंती राहणार आहे, की आमच्यासाठी चारा छावण्यांसारखं एखादं माध्यम उपलब्ध करून दिलं तर ही जनावरं टिकतील, जगतील अन्‌ आमच्या पोटापाण्याची वेवस्ता राहील नसता आमी आगदी भिकेला लागलोय. जनावरांची पोटं खोल गेलीत. त्यांची २५ टक्‍के गरजच पूर्ण करू लागलोय. सरकारनं चारा छावण्यांची वेवस्था करून दिली तर त्याच्यातुनसनी आमची जनावरं वाचतील. पुडच्या काई गोस्टी वेवस्तीत राहतील. आज परिस्थिती अशी आलीय की आमची सर्व मुलं १८ वर्सांच्या पुढची, दहावी पास झालेली. त्यांना वेठबिगारीसाठी शहराकडं धाडावं की काय, असा मानस तयार झालाय अन्‌ आमी जेवढी वयस्कर मंडळी हाय तेवढी कसंतरी या ढोराईच्या जोपर्यंत हाय तवर जीव लावायचा अन्‌ आमाला नाय झ्यापलं तर आमाला ही जनावरं विकावं लागणाराय. एकदा विकलेलं जनावर परत आमच्याकून होणार नाही. पाण्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे. वावरातली ५५ फूट विहीर तिच्यात आता दीड फूट पानी हाय. तेच पानी कसंतरी जनावरांना शेंदून पाजायचा प्रयत्न करतोय. आता ती कुठपर्यंत पुरंल माहीत नाही. एक महिन्यानंतर आमच्या या जनावरांना पाण्याचासुद्धा प्रश्‍न येणार आहे. आज चाऱ्याचा आहे महिनाभरानं पाण्याचा प्रश्‍न उभा ऱ्हाणाराय.’

जनवरायला इकताबी येईना
सेलूद चारठाचे भगवान काकडे म्हणाले, ‘‘चाराच नाय जनावरायला. इकूनतिकून इकत आणा लागतो; पण आता इकतबी भेटू नाय ऱ्हायला. तिकडून बुलडाण्याच्या चिखलीहून सोयाबीनचा भुसा आणला होता. एक टेंपो भरून आला होता, १५ हजार रुपये गेले होते, भाडयासहित. आता तेबी भेटू नाय ऱ्हायला. आता थोडाफार ऊस घेतो तेबी महाग पडतो. तीन-साडेतीन हजार रुपये टन भेटंतो. पान्याचीबी लै अडचन. आमच्याकडं शेततळे मनून त्याच्यातून थोडं-थोडं काडून देतो. पाण्याची जास्तच अडचनै. प्यायलाबी पानी नै, जनवरायलाबी पानी नै. १५ जनावरं हैत आमच्याकडं आता ते ठेवायलाबी पुरू नाय ऱ्हायले. खायाला काय घालावं. इकताबी येईना. गिराईकबी नैना. त्यानं आता काय करावं कळंना.’’

अर्ध्या पोटानं कसंतरी चालू हाय
मंजाराम पठाडे म्हणतात, ‘म्हाग चारा घेटला अन्‌ त्योबी असं थोडं जपूनच घालू लागू राह्यलं. जनावराला तकलीबच हाय म्हणा, ज्यादा काई पोटभर घातला जात नाही. अर्ध्या पोटानं कसंतर भागाभागी चालू हाय म्हना. हिरीचंच पानी हाय. पानी आट-पंदरा दिवस पाणी पुरू शकतं, आता जवर हाय तवर नंतर काय पानी रानार नाई आता.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com