घाटीत रुग्णांसह नातेवाइकांची पाण्यासाठी भटकंती

औरंगाबाद - घाटीत पिण्याच्या पाण्यासाठी रुग्णांना करावी लागत असलेली भटकंती.
औरंगाबाद - घाटीत पिण्याच्या पाण्यासाठी रुग्णांना करावी लागत असलेली भटकंती.

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) पाणीटंचाईमुळे रुग्ण व नातेवाइकांचे हाल होत आहेत. तापमानाने चाळिशी पार केलेली असताना घाटीतील पाणीबाणीमुळे विकतच्या पाण्यावर झुंबड उडत आहे. एकीकडे पाणीपुरवठा लाइनच्या व्हॉल्व्हला नादुरुस्तीचे ग्रहण, तर दुसरीकडे महापालिकेकडून होणारा अपुरा पाणीपुरवठा यामुळे घाटी प्रशासन पाण्याच्या जुगाडाने त्रस्त झाले आहे.

घाटीत दररोज येणारे रुग्ण, आंतररुग्ण विभागात उपचार घेणारे रुग्ण, रुग्णांसोबतचे नातेवाईक आणि कर्मचारी व डॉक्‍टर अशा एकूण सुमारे आठ ते दहा हजार जणांची पाणी सुविधा करणे घाटी प्रशासनाला जड जात आहे.

परिसरातील दोनपैकी एकच पाणपोई सध्या सुरू आहे. पाण्याच्या व्हेंडिंग मशीनलाही घाटीत परवानगी देण्यात आली असली तरी या उपाययोजना कमी पडत आहेत. घाटीतील पाचही वसतिगृहांची तहान विकतच्या जारच्या पाण्यावर भागविली जात आहे. वापराच्या पाण्याचा प्रश्‍न तर वेगळाच आहे. कर्मचारी निवासस्थानांची भिस्त सध्या टॅंकरवरच आहे. 

नादुरुस्तीचा खोडसाळपणा 
सर्जिकल इमारतीतील वॉर्ड क्रमांक ३०ची पाण्याची टाकी गेल्या सहा महिन्यांत चार वेळा फोडण्यात आली. तर मेडिसीन इमारतीतील वॉर्ड क्रमांक पाचच्या पाइपलाइनमध्ये लाकडी दांडे फासविण्याचे प्रकार आढळून आले. या दोन्ही वॉर्डांत इतर वॉर्डांच्या तुलनेत जास्त रुग्ण दाखल असतात. हे खोडसाळ प्रकार सातत्याने घडत असल्याने रुग्णसेवा प्रभावित होत आहे. शिवाय रुग्ण व नातेवाइकांच्या रोषाला परिचारिकांना सामोरे जावे लागत आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी आज घाटीच्या जीर्ण झालेली पाइपलाइन आणि व्हॉल्व्हची पाहणी करून १५ व्हॉल्व्ह बदलून देण्यासाठी सहमती दर्शविली आहे. शिवाय घाटीत सध्या उपलब्ध दोन विहिरींच्या पाण्याचा वापर व टॅंकरने पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे. महापालिकेने आवश्‍यक पाणी देण्याची गरज आहे.
- डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com