टॅंकर येताच उडते झुंबड

अविनाश काळे
मंगळवार, 2 एप्रिल 2019

एप्रिल महिना सुरू झाल्याने उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. उन्हाचे चटके सहन करीत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तालुक्‍यातील नारंगवाडी येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, टॅंकरची प्रतीक्षा करीत दिवसभर उन्हात, तर कधी रात्रीही उशिरापर्यंत थांबावे लागत आहे.

उमरगा - एप्रिल महिना सुरू झाल्याने उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. उन्हाचे चटके सहन करीत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तालुक्‍यातील नारंगवाडी येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, टॅंकरची प्रतीक्षा करीत दिवसभर उन्हात, तर कधी रात्रीही उशिरापर्यंत थांबावे लागत आहे. प्रलयंकारी भूकंपानंतर १९९८ मध्ये झालेल्या २२ खेडी पाणीपुरवठा योजनेचे पाणी गावात काही महिन्यापर्यंतच आले. ही योजना निकामी झाल्याने राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी प्रयत्न झाले; मात्र त्या योजनेलाही स्थगिती मिळाल्याने ग्रामस्थांना दरवर्षी पाण्यासाठी पायपीट करावी लागते.

भूकंपाच्या तडाख्यात अडकलेल्या नारंगवाडी ग्रामस्थांचे तीन ठिकाणी पुनर्वसन झाले. लोकांना घरे मिळाली, मात्र पाण्याचे कायमस्वरूपी स्रोत उपलब्ध होऊ शकले नाहीत. नारंगवाडी पूर्व, पश्‍चिम व नारंगवाडीची वाडी अशा लोकवस्तीत जवळपास साडेसात हजार लोकसंख्या आहे. ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या भूकंपानंतर राज्य सरकारने खास बाब म्हणून १९९८ मध्ये २२ खेडी पाणीपुरवठा योजना राबविली; परंतु या योजनेचे पाणी क्षणभंगुर ठरले. या योजनेचे काम निकृष्ट झाल्याने गेल्या बारा वर्षांपासूनही योजनेचे पाणीच बंद झाले आहे. गावात अंतर्गत जलवाहिनी आता कुचकामी ठरली आहे. 

राष्ट्रीय पेयजल योजनेला स्थगिती
२२ खेडी योजनेअंतर्गत झालेली पाणीपुरवठा योजना निकामी झाल्याने ग्रामपंचायतीने राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी पाठपुरावा केला होता, या योजनेसाठी एक कोटी १७ लाख रुपये मंजूर झाले होते. योजना मंजूर झाल्याने पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपेल असा ग्रामस्थांमध्ये विश्वास निर्माण झाला होता; मात्र सरकारने ऐनवेळी या योजनेला स्थगिती दिल्याने योजना बारगळली. नारंगवाडीचा भाग महसूल विभागाच्या अहवालात रेड झोनमध्ये आहे. जमिनीतील पाणीपातळी खालावत असल्याने दरवर्षी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नारंगवाडीकरांनी जलयुक्त शिवार योजनेत लोकवाट्यातून चांगली कामे केली आहेत; मात्र या मंडळात दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी असते. कायमस्वरूपी योजना कार्यान्वित झाली तरच या भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

भूकंपानंतर पुनर्वसनामुळे गावाचा विस्तार वाढला. २२ खेडी योजनेत या गावाचा समावेश होता; मात्र या योजनेचा दीर्घकाळ फायदा झाला नाही. राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली असताना पुन्हा त्या योजनेला स्थगिती दिल्याने पाणीप्रश्‍न भेडसावत आहे. जुनीच योजना दुरुस्त करण्याचे शासनाने सूचित केले असले, तरी ती योजना दुरुस्त करण्यासारखी राहिलेली नाही. सरकारने पुनर्विचार करून कायमस्वरूपी पाणी योजनेला सहकार्य करणे अपेक्षित आहे. 
- शेखर घंटे, जिल्हा परिषद सदस्य.

१६ हातपंप कोरडे
गावात एकूण १९ हातपंप आहेत; मात्र पाण्याअभावी १६ हातपंप बंद पडलेले आहेत. केवळ तीन हातपंपातून पाणी मिळत असले, तरी त्याचीही क्षमता आता संपत आली आहे. पाणीपातळी खोलवर गेल्याने गावालगतच्या शेतशिवारातील पाण्याचे स्रोतही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. नारंगवाडी पश्‍चिममध्ये टंचाईची भीषणता अधिक आहे. सार्वजनिक विहीर कोरडी पडल्याने नागरिकांसमोर दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे येथे दोन टॅंकरद्वारे दररोज सहा खेपा केल्या जातात. विजेच्या भारनियमनाच्या वेळापत्रकामुळे ग्रामस्थांना कधी दिवसा उन्हात, तर कधी रात्री उशिरापर्यंत पाण्यासाठी थांबावे लागते. नारंगवाडी पूर्वमध्ये एक, तर नारंगवाडीची वाडीत एका अधिग्रहणाद्वारे पाणी मिळत आहे. येत्या पंधरा दिवसांनंतर पुन्हा अधिग्रहण वाढवावे लागेल, अशी स्थिती निर्माण होऊ शकते.

Web Title: Water Shortage Water Supply Tanker People