हाकेच्या अंतरावर टाकी, पण घरात थेंबभरही येईना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मे 2019

आंदोलन करूनही मिळाले नाही पाणी
शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास आंबेडकरनगर परिसरातील ४०-५० महिला एन-सात येथील पाण्याच्या टाकीजवळ पोचल्या. आम्ही टॅक्‍स भरतो. तरीही आम्हाला पाणी मिळत नाही. पंधरा दिवसांपासून घरात पाण्याचा थेंब नाही, अशी कैफियत मांडत महिलांनी पाण्याची मागणी केली. दरम्यान, काही महिला थेट टॅंकरवर चढल्या. काहींनी टॅंकरचा पुरवठा बंद पाडला. महिलांची आक्रमकता बघून टॅंकरचालकांनीही तेथून काढता पाय घेतला. तासभर आंदोलन करूनही त्यांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे नाइलाजाने महिलांनाही परत फिरावे लागले. आंदोलनात सुमन जाधव, पुष्पा जलकर, मीना शिंदे यांच्यासह अनेकांचा सहभाग होता.

औरंगाबाद - पाण्याची टाकी हाकेच्या अंतरावर, डोळ्यांदेखत दिवसभर टॅंकर भरून जातात; मात्र एन-सात पाण्याच्या टाकीजवळच्या आंबेडकरनगरात लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पंधरा दिवसांपासून नळाला पाणी आले नाही. घरात पाण्याच थेंब नाही, असे म्हणत घोषणाबाजी करीत शनिवारी (ता. ११) संतप्त महिलांनी पाण्याची टाकी गाठली. टॅंकरचा पाणीपुरवठा बंद पाडला; तर काही महिलांनी पाणी द्या म्हणत चक्‍क टॅंकरवर चढण्याचा प्रयत्न केला. महिलांचा रोष बघून टॅंकरचालकही निघून गेले.

जिथे महापालिकेची नळ योजना पोचली नाही किंवा जिथे पाणीपुरवठा होऊ शकला नाही त्या भागात सिडको एन-पाच व एन-सात येथील टाक्‍यांवरून टॅंकर भरून पाणीपुरवठा करण्यात येतो. चार दिवसांपूर्वी महापौर नंदकुमार घोडेले यांनी घेतलेल्या पाणीपुरवठ्यासंदर्भातील बैठकीत या दोन्ही टाक्‍यांवरून टॅंकर भरले जात असल्याने नळ योजना असलेल्या वॉर्डांना पाणीपुरवठा होत नाही. यामुळे सर्व टॅंकर एन-एक येथील एमआयडीसीच्या टाकीकडे वळवण्याचे आदेश दिले. आयुक्‍तांनी तसे आदेशही काढले तरीही टॅंकरचालकांचे एन-सात व एन-पाचच्या टाकीवरून पाणी भरणे सुरूच होते. दुसरीकडे एन-एक टाकीच्या फिलिंग पॉइंटवरून पाणी गढूळ येत असल्याने लोक त्या टाकीचे पाणी नको म्हणत आहेत. त्यामुळे टॅंकरचालक एन-सातकडेच धाव घेत आहेत. ही टाकी आंबेडकरनगरच्या जवळच आहे. पाण्याची टाकी आणि आंबेडकरनगर दोन्हीमध्ये फक्‍त जळगाव रस्ता आहे. असे असले तरी पाण्यासाठी या वस्तीतील लोकांना वणवण भटकण्याची वेळ आली. शनिवारी तेथील महिलांचा संयम सुटला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Shortage Water Tanker