हजारो लिटर पाण्याचे फवारे!

अनिल जमधडे
गुरुवार, 11 जुलै 2019

एकीकडे टंचाई, दुसरीकडे गळती 
मराठवाड्यात कायम दुष्काळी स्थिती आहे. गेल्या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली. उन्हाळ्यात तर बोअर, विहिरी आटल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जात असताना, रेल्वे प्रशासनाला मात्र पाण्याबद्दल फिकीर नसल्याचे दिसते. रेल्वेस्थानकाच्या परिसरात पाण्यासाठी विहीर केलेली आहे. विशेष म्हणजे या विहिरीला कायमच प्रचंड पाणी आहे. रेल्वेकडे गरजेइतके पाणी आहे. पाणी निसर्गाची संपत्ती असल्याने पाणी वाचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. या जबाबदारीने रेल्वेने वाया जाणाऱ्या पाण्याकडे लक्ष देऊन गळत्या बंद केल्या पाहिजेत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

औरंगाबाद - औरंगाबाद रेल्वेस्थानकात येणाऱ्या जवळपास प्रत्येक रेल्वेमध्ये पाणी भरले जाते; मात्र हे पाणी भरण्यासाठीची यंत्रणा सक्षम आणि सुस्थितीत नाही. तुटक्‍या किंवा लहानमोठ्या पाइपने डब्यातील टाकीत पाणी भरले जाते. यात टाकीत जाणाऱ्या पाण्याइतकेच पाणी वाया जात आहे. हजारो लिटर पाण्याची पाण्याची नासाडी सुरू आहे. विशेष म्हणजे, वर्षानुवर्षे हा गंभीर प्रकार सुरू असताना, त्याकडे रेल्वे प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही.

रेल्वेस्थानकावर दररोज येणाऱ्या विविध रेल्वेगाड्यांमध्ये पाणी भरण्याची सोय केलेली आहे. औरंगाबाद रेल्वेस्थानकावरील चारही प्लॅटफॉर्मवर रेल्वेत पाणी भरण्याची व्यवस्था आहे. नांदेड-अमृतसर सचखंड एक्‍स्प्रेस, कोल्हापूर-धनगाव, नगरसोल-नरसापूर, नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्‍स्प्रेस, तपोवन एक्‍स्प्रेस यासह सर्वच पॅसेंजर रेल्वेगाड्यांमध्ये औरंगाबाद स्थानकावर पाणी भरले जाते. 

दररोज किमान आठ ते दहा रेल्वेगाड्यांमध्ये पाणी भरण्यात येते. अनेक रेल्वेगाड्यांचे पाणी भरण्याचे शेड्युल औरंगाबादला आहे. काही रेल्वेगाड्यांना गरज पडली तर पाणी भरावे लागते. रेल्वेस्थानकारवर पाणी भरण्यासाठी असलेली पाइपिंग सिस्टीम आणि रेल्वेच्या पाणी भरण्याच्या कॉकमध्ये विविधता आहे. प्रत्येक रेल्वेचे पाणी भरण्याचे कॉक वेगवेगळ्या आकाराचे आहेत. त्यामुळेच रेल्वेस्थानकावरील पाइपिंग सिस्टीमधून पाणी भरताना ज्या प्रेशरने पाणी टाकीत जाते, त्याच प्रेशरने अर्धे पाणी बाहेर पडून वाया जाते. एका डब्याच्या दोन बाजूच्या पाण्याच्या टाकीत प्रत्येक एक हजार याप्रमाणे दोन हजार लिटर पाणी भरावे लागते. साधारणतः एका रेल्वेला १८ ते २४ डबे आहेत. म्हणजेच दररोज साधारण पन्नास हजार लिटर पाणी रेल्वे गाड्यांना लागते, त्यापैकी पाच हजार लिटरपेक्षा अधिक पाणी वाया जाते. रेल्वेत पाणी भरण्याची ही पद्धत वर्षानुवर्षे सुरू आहे; मात्र रेल्वे प्रशासन या पाणी वाया जाण्याच्या प्रकाराकडे लक्ष देत नाही. जवळपास सर्वच रेल्वेस्थानकात हाच प्रकार सुरू असल्याने रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दररोज हजारो लिटर पाणी अक्षरश: वाया जात आहे. 

रेल्वेत पाणी भरण्यासाठीची एकसारखी किंवा अद्ययावत यंत्रणा नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दररोज पाणी वाया जाते. यासाठी सर्वच रेल्वेस्थानकावर अद्ययावत एकसारखी यंत्रणा उभारण्याची गरज आहे. 
- संतोषकुमार सोमाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सेना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Supply Railway Station Water Loss