सोलारपंपावर पाणीपुरवठा करा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद - ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासाठी विजेच्या भारनियमनाची आडकाठी नको यासाठी सोलारपंप बसविण्यात येणार आहेत. तीन किंवा पाच अश्‍वशक्‍तीच्या विद्युत मोटारी जिथे आहेत अशा ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी असे सोलारपंप बसवणे शक्‍य असल्याने ग्रामपंचायतींनी सोलरपंप बसवावेत, असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पवनीत कौर यांनी दिले आहेत. 

औरंगाबाद - ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासाठी विजेच्या भारनियमनाची आडकाठी नको यासाठी सोलारपंप बसविण्यात येणार आहेत. तीन किंवा पाच अश्‍वशक्‍तीच्या विद्युत मोटारी जिथे आहेत अशा ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी असे सोलारपंप बसवणे शक्‍य असल्याने ग्रामपंचायतींनी सोलरपंप बसवावेत, असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पवनीत कौर यांनी दिले आहेत. 

ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजनेची वीजबिले न भरल्यामुळे मोठ्या प्रमाणात वीजबिले थकल्याने बऱ्याच योजना बंद पडतात. त्या कायमस्वरूपी निकामी होण्याची शक्‍यता असते. यावर सोलरपंप हा चांगला पर्याय आहे. एकीकडे ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या योजना, तर दुसरीकडे पाणी उपलब्ध असते; मात्र त्याचा उपसा करण्यासाठी वीज भारनियमनाचा अडथळा येतो. वारंवार येणाऱ्या अडचणींवर सोलारपंपामुळे मात करता येईल, वीजबिलाच्या आर्थिक ओझ्यातून ग्रामपंचायतीची सुटका होईल आणि विजेच्या बाबतीत स्वावलंबी होतील. सोलारपंप उभारणीसाठी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या मासिक बैठकीत माहिती देऊन वित्त आयोग, अनुसूचित जाती वस्ती विकास योजना, ग्रामनिधी आदी योजनांतून प्राप्त होणाऱ्या अनुदानातून प्राधान्याने अस्तित्वात असलेल्या तीन ते पाच अश्‍वशक्‍तीच्या इलेक्‍ट्रिक पंपाच्या जागी सोलारपंपाची उभारणी करण्याविषयी कार्यवाही करावी, असे सीईओंनी या आदेशात म्हटले आहे. 

ग्रामपंचायतींनाही फायदा 
जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाचे उपअभियंता बाळासाहेब पाटील यांनी सांगितले, तीन ते पाच अश्‍वशक्‍तीच्या पाणीपुरवठा योजनावर इलेक्‍ट्रिक पंपाऐवजी सीईओंच्या आदेशानुसार सोलारपंप बसवले; तर कमकुवत ग्रामपंचायती सक्षम होती. वीजबिल भरण्याचा त्यांना प्रसंग येणार नाही. 

सद्यःस्थितीत अशा प्रकारे फुलंब्री तालुक्‍यात आळंद व खुलताबाद तालुक्‍यात चिंचोली आखातवाडा येथे पाच अश्‍वशक्‍तीचे सोलारपंप बसवण्यात आले आहेत. चार हजार 800 वॉटचे सोलार पॅनेल बसविण्यात आले असून, यातून होणाऱ्या वीजनिर्मितीतून रोज 80 हजार ते एक लाख लिटर पाणी उपसा करण्यात येत आहे. यामुळे सोलारपंप बसवणे हे ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर, तर गावकऱ्यांना वीज भारनियमनामुळे पाणीपुरवठ्यापासून वंचित राहण्याची वेळे येणार नाही, अशी अपेक्षा व्यक्‍त केली.

Web Title: Water supply on Solar Pumps