हुश...व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम पूर्ण, दोन एमएलडी पाणी गेले वाहून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 1,400 मिलिमीटर व्यासाच्या पाइपलाइनचा व्हॉल्व्ह गुरुवारी (ता. आठ) रात्री पैठण रोडवरील धनगाव येथे निखळला होता. त्यामुळे सुमारे दोन एमएलडी पाणी वाया गेले. रात्री उशिरा पंप बंद करून व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यात आली. असे असले तरी शुक्रवारी (ता. नऊ) शहरातील बहुतांश भागांचा पाणीपुरवठा विस्कळित झाला. 

औरंगाबाद - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 1,400 मिलिमीटर व्यासाच्या पाइपलाइनचा व्हॉल्व्ह गुरुवारी (ता. आठ) रात्री पैठण रोडवरील धनगाव येथे निखळला होता. त्यामुळे सुमारे दोन एमएलडी पाणी वाया गेले. रात्री उशिरा पंप बंद करून व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यात आली. असे असले तरी शुक्रवारी (ता. नऊ) शहरातील बहुतांश भागांचा पाणीपुरवठा विस्कळित झाला. 

पावसाळ्यातही शहरातील पाण्याचे वेळापत्रक पूर्वपदावर आलेले नाही. त्यात अनेक बिघाड होत असल्यामुळे पाणीपुरवठा विभागासमोरील अडचणी वाढल्या आहेत. गेल्या आठवड्यात फारोळा येथील दोन रोहित्र जळाल्याने एक पंप बंद पडला होता. त्यामुळे पाणी उपसा घटला व सिडको-हडकोत ठणठणाट निर्माण झाला. आठ ते दहा दिवसांनंतरही नळाला पाणी न आल्याने नागरिक संतप्त आहेत. त्यात गुरुवारी सायंकाळी 1,400 मिलिमीटर व्यासाच्या मुख्य पाइपलाइनवरील धनगाव येथील व्हॉल्व्ह निखळला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पंप बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र, दरम्यानच्या काळात म्हणजेच सव्वानऊ वाजेपर्यंत किमान दोन एमएलडी पाणी वाहून गेले. उपअभियंता किरण धांडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे काम हाती घेतले. दोन तासांनंतर दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर रात्री अकरा वाजता जायकवाडीतून पाणी उपसा सुरू करण्यात आला. त्यानंतर रात्री बारा वाजेनंतर शहरात पाणी आले. 
 
अनेक भागांत ठणठणाट 
रोहित्र जळाल्याने सिडको-हडकोसह इतर भागांत आठ दिवसांनंतरही पाणी आलेले नव्हते. त्यात शुक्रवारी व्हॉल्व्ह निखळल्यामुळे सुमारे चार तास शहरात येणारे पाणी बंद होते. त्यामुळे शुक्रवारी शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला. पाच टप्पे पाच ते सहा तास उशिराने देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Supply Valve repair completed at Aurangabad