बीड जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बनताहेत तीव्र, गावांना टॅंकरद्वारे पुरवठा

अनिरुद्ध धर्माधिकारी 
Sunday, 17 May 2020

बीड जिल्ह्यातील इतर तालुक्यांना अतिवृष्टीचा सामना करावा लागला असला, तरी आष्टी तालुक्यात या कालावधीत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने दोन-चार तलाव भरून वाहिले, तर इतर तलावांत थोड्याफार प्रमाणात पाणीसाठा झाला. त्यामुळे दिलासा मिळाल्यानंतर सुरू असलेले टॅंकर्स प्रशासनाने बंद केले.

आष्टी (जि. बीड) - एकीकडे कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावावरील उपाययोजना करण्यात प्रशासन मग्न असताना दुसरीकडे गतवर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यातील अनेक गावांतील पाणीटंचाईने तीव्र स्वरूप धारण केले असून, ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. पाणीटंचाई सुरू असलेल्या तालुक्यातील ३२ गावांमध्ये ५१ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. 

गतवर्षी तालुक्यात भीषण पाणीटंचाईमुळे १५० टॅंकरद्वारे सर्वच गावांना पाणीपुरवठा सुरू होता. यानंतर पावसाळ्यातही अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला. पावसाळ्याच्या शेवटी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात राज्यात अतिवृष्टी झाली होऊन मोठे नुकसान झाले. बीड जिल्ह्यातील इतर तालुक्यांना अतिवृष्टीचा सामना करावा लागला असला, तरी आष्टी तालुक्यात या कालावधीत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने दोन-चार तलाव भरून वाहिले, तर इतर तलावांत थोड्याफार प्रमाणात पाणीसाठा झाला. त्यामुळे दिलासा मिळाल्यानंतर सुरू असलेले टॅंकर्स प्रशासनाने बंद केले.

हेही वाचा - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार

मात्र, जानेवारी महिन्यापासून भूगर्भातील पाण्याची पातळी वेगाने खालावण्यास सुरवात झाल्याने अनेक गावांत पाणीटंचाईचे पहिले पाढे पंचावन्न पुन्हा सुरू झाले आहेत. मार्च महिन्यापासून अनेक गावांतून पाण्याचे टॅंकर सुरू करावेत, अशी मागणी प्रशासनाकडे येऊ लागली. त्यानुसार टॅंकर्सना मंजुरी मिळून सध्या ३२ गावांमध्ये ५१ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. 

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

टॅंकर्स सुरू असणारी गावे 
मुर्शदपूर, हरिनारायण आष्टा, ब्रह्मगाव, पांढरी, बीडसांगवी, जोगेश्वरी पारगाव, मातुकळी, मातावळी, वनवेवाडी, टाकळसिंग, जामगाव, देवीगव्हाण, डोंगरगण, पिंपळगाव दाणी (प्रत्येकी दोन) शेडाळा, रुईनालकोल, हिवरा, कऱ्हेवाडी, हाजीपूर, आंबेवाडी, कासेवाडी, भातोडी, बेलगाव, कऱ्हेवडगाव, शेरी बुद्रुक, खाकाळवाडी, धानोरा, चोभानिमगाव, कोयाळ, वटणवाडी, शेरी खुर्द, सांगवी आष्टी, हारेवाडी, पिंपळगाव घाट, मराठवाडी, शेकापूर. 

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

आणखी ३८ गावांचे प्रस्ताव पाठविले 
तवलवाडी, बाळेवाडी, दैठणा, पिंपळसुटी, कुंबेफळ, वाळुंज, देऊळगाव घाट, सोलेवाडी, करंजी, केरूळ, देवळाली, लोखंडवाडी, चिंचोली, हनुमंतगाव, इमनगाव, वाघळुज, चिंचाळा, राघापूर, दौलावडगाव व वस्त्या, जळगाव, साबलखेड, चिखली, दादेगाव, कोकरेवाडी, खरडगव्हाण या गावांचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे मंजुरीस्तव पाठविण्यात आले असून बावी, पिंपरखेड, कुंभारवाडी, धनगरवाडी, हातोला, बांदखेल, मांडवा, पोखरी, खुंटेफळ पुंडी, भाळवणी, मंगरूळ, खानापूर या गावांनी नव्याने पंचायत समितीच्या पाणीटंचाई कक्षात प्रस्ताव दाखल केले आहेत. 

 

तालुक्यातील पाणीटंचाईने सध्या उग्र रूप धारण करण्यास सुरवात केली आहे. सध्या ३२ गावांत टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू असून आणखी ३८ गावांचे प्रस्ताव मंजुरीसाठी उपविभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. नव्याने काही प्रस्ताव पाणीटंचाई विभागाकडे येत असून, पाणीटंचाई जाणवत असलेल्या ग्रामपंचायतींनी पंचायत समितीमध्ये तातडीने प्रस्ताव दाखल करावेत. 
- सुधीर भागवत, गटविकास अधिकारी, आष्टी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water supply to villages in Ashti taluka by tanker