उन्हाच्या चटक्‍याने टॅंकरची संख्या वाढली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

जिल्ह्यातील 159 गावांना 180 टॅंकरने पाणीपुरवठा

जिल्ह्यातील 159 गावांना 180 टॅंकरने पाणीपुरवठा
औरंगाबाद - उन्हाचा चटका वाढताच जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, अनेक तलाव आटल्यानंतर आता विहिरींच्या पाण्याची पातळीसुद्धा खोल गेल्याने 159 गावे, एका वाडीला 180 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. प्रत्येक आठवड्यामध्ये टॅंकरच्या संख्येत वाढ होत असून, अनेक गावांनी टॅंकरची मागणी नोंदविली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात सध्या सर्वाधिक 74 टॅंकर गंगापूर तालुक्‍यात सुरू आहेत. त्याखालोखाल सिल्लोड 29, वैजापूर तालुक्‍यात 28 टॅंकर सुरू आहेत. सध्या सोयगाव आणि पैठणमध्ये टॅंकर सुरू करण्यात आलेले नाहीत. पाणीपुरवठ्यासाठी 13 शासकीय, तर 167 खासगी टॅंकरचा सध्या वापर केला जात आहे. या टॅंकरच्या 353 खेपा होत आहेत. पाणीपुरवठ्यासाठी 82 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात 2 लाख 17 हजार 331 लोकसंख्येला टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

दूषित पाण्याचा धोका
ग्रामीण भागात पाण्याचे स्रोत कमी होत चालल्याने नागरिकांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. यामध्ये दूषित पाण्याचा वापर नाइलाजाने वाढला आहे. काही ठिकाणी तर पाणी पिण्यायोग्य नसले तरी ते वापरासाठी आणले जात आहे. सध्या विहिरींनी तळ गाठलेला आहे. याच विहिरींतून अनेक जण पाणी वापर करीत आहेत.

Web Title: water tanker increase in summer