‘आइस्क्रीम टरबुज’ही बाजारात!

अनिल जमधडे 
बुधवार, 10 एप्रिल 2019

मराठवाड्यात उन्हाळी परिस्थिती असतानाही अभिनव पद्धतीने प्रयोग करून पैठणच्या (जोगेश्‍वरी) येथील मुकुंद महाराज जोशी यांनी अनेक शेतकऱ्यांना उभे करण्याचा विडाच उचलला आहे.

औरंगाबाद - उन्हाळा सुसह्य करणाऱ्या टरबुजांच्या थेट तैवानच्या विविध जातींची लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्याचा पहिला मान मराठवाड्यातील पैठणच्या शेतकऱ्याने मिळविला आहे. चेतक घोडा चौकात लावलेल्या स्टॉलवर त्यांच्या मालाला प्रंचड मागणी वाढली आहे. 

मराठवाड्यात उन्हाळी परिस्थिती असतानाही अभिनव पद्धतीने प्रयोग करून पैठणच्या (जोगेश्‍वरी) येथील मुकुंद महाराज जोशी यांनी अनेक शेतकऱ्यांना उभे करण्याचा विडाच उचलला आहे. तैवानच्या कंपनीने टरबुजामध्ये क्रांती केल्याची माहिती मिळाल्यावर मुकुंद महाराज यांनी सदर सीड्‌स कंपनीच्या उत्पादनांची माहिती गोळा केली. केवळ ७० दिवसांत एकरी दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न देणाऱ्या विविध चार जातींची लागवड स्वत:च्या शेतात केली आणि परिसरातील अन्य शेतकऱ्यांनाही प्रोत्साहित केले. पैठणपाठोपाठ आता गंगापूरच्या शेतकऱ्यांनीही या टरबुजांची लागवड केली आहे. कंपनीचे अधिकारी तानाजी नाईकनवरे, अजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव (ता. पैठण) येथील शेतकरी सुभाष गवळी यांच्या शेतात केलेल्या प्रयोगाचे मराठवाड्यातील पहिले उत्पादन बाजारात आले आहे. या नवीन टरबुजांना विदेशातही मागणी असल्याची माहिती मुकुंद महाराज जोशी यांनी दिली.

असे आहेत फ्लेवर 
अनमोल नावाचा हा ‘नॅचरल यलो’ टरबूज आहे. बाहेरून हिरवा आणि आतून पिवळा असलेला हा टरबूज तोंडात जाताच विरघळतो. आईस्क्रीम खात असल्याचा नवीन अनुभव या टरबुजातून मिळतो. 
‘सरस्वती ज्युसी’ हा बाहेरून हिरवा आतून लाल असलेला टरबूज खाण्यास अत्यंत मधुर आहे. 
‘विशाला हा गोल्डन स्वीटनेस’ असलेला टरबूज बाहेरून पिवळा आतून लाल आहे. 
‘मन्नत’ हा बाहेरून गर्द हिरवा, आतून लालसर गुलाबी कमी गोड शुगरफ्री टरबूज आहे.

Web Title: watermelon flavour ice cream available in market