esakal | टरबूज विक्रीला सोशल मीडियाने दिला आधार...कुठे वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli photo

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी टरबुजाची प्रसिद्धी केली. शहरातील अनेक ग्राहकांनी शेतातून माल विकत नेला. मात्र, टरबुजाला बाजारभाव कमी असल्याने आठ रुपये किलो दराने मालविक्री करावा लागला. यातून त्यांना ४० हजार रुपये हाती पडले.

टरबूज विक्रीला सोशल मीडियाने दिला आधार...कुठे वाचा

sakal_logo
By
जगन्नाथ पुरी / प्रभाकर बारसे

सेनगाव (जि. हिंगोली): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे निघालेल्या शेतमालाचा वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शहरातील टरबूज उत्पादक शेतकरी मोहन बुद्रुक यांनाही याचा फटका सहन करावा लागला. मात्र, त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टरबूज विक्री केल्याने होणारे मोठे नुकसान टळले.

सेनगाव येथील शेतकरी मोहन बुद्रुक हे दोन एकरांत टरबूज लागवड करतात. यातून खर्च वजा जाता त्यांना दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. या वर्षीही त्‍यांनी जानेवारी महिन्यात एक एकर क्षेत्रावर टरबुजाची लागवड केली. 

हेही वाचा लॉकडाउनचा फटका: टोमॅटो पिकात सोडली जनावरे

परिस्थितीला सामोरे जाण्याचा निर्णय

लागवडीनंतर तीन महिन्याने मालतोंडीला येतो. फवारणी व खत योग्य पद्धतीने दिल्यामुळे त्यांना २५ टन टरबुजाचे उत्पादन झाले. श्री. बुद्रुक यांना एक एकर टरबूज लागवडीपासून काढणीपर्यंत ७० हजार रुपये खर्च आला. मात्र, कोरोना संकटामुळे लॉकडाउन सुरू झाल्याने शेतमाल पडून राहिला. त्यामुळे त्यांनी खचून न जाता परिस्थितीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. 

 ४० हजार रुपये हाती पडले

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी टरबुजाची प्रसिद्धी केली. शहरातील अनेक ग्राहकांनी शेतातून माल विकत नेला. मात्र, टरबुजाला बाजारभाव कमी असल्याने आठ रुपये किलो दराने मालविक्री करावा लागला. यातून त्यांना ४० हजार रुपये हाती पडले. लागवडीसाठी झालेल्या ५५ हजार रुपये खर्चापैकी केवळ ४० हजार रुपये वसूल झाले आहेत. सोशल मीडियाचा वापर करून किमान उत्पादन खर्चतरी काही अशी हाती आल्याने होणारे मोठे नुकसान टळले आहे.

टरबूज शेती तोट्यात गेली

दरवर्षी दोन एकर शेतीत दोन टप्प्यांत टरबूज लागवड केली जाते. त्यातून एकरी एक लाख रुपये उत्पन्न मिळते. मात्र, या वर्षी पहिल्या टप्प्यात चांगले उत्पादन निघाले. परंतु, लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांनी माल खरेदी केला नाही. दुसऱ्या टप्प्यातील पिकांना खते औषधी वेळेवर मिळाली नाही. म्हणून या वर्षी टरबूज शेती तोट्यात गेली.
- मोहन बुद्रुक, शेतकरी

व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून टरबुजाची विक्री

गिरगाव : वसमत तालुक्यातील गिरगावसह परिसरातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी या वेळी टरबूज लागवड केली. मात्र, लॉकडाउनमुळे विक्रीसाठी अडथळे निर्माण होत आहेत. अशातही काही शेतकऱ्यांनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून टरबूज विक्रीचा मार्ग शोधला आहे.

येथे क्लिक कराधक्कादायक : हिंगोलीत कोरोनाबाधितांचे अर्धशतक

संचारबंदीमुळे सर्वत्र बाजार बंद

गिरगावसह खाजमापूरवाडी, बोरगाव खुर्द, सोमठाणा, पार्डी बुदुक आदी गावांतील शेतकऱ्यांनी या वर्षी इसापूर व येलदरी धरणाच्या पाण्यावर फळबाग म्हणून टरबूज पिकांची लागवड केली आहे. या भागात दोनशे एकरवर लागवड झाली आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउन, संचारबंदीमुळे सर्वत्र बाजार बंद झाले. 

पाच रुपये प्रती किलोचा दर

यामुळे टरबूज पिकांना कोणताही व्यापारी वर्ग खरेदी करण्यासाठी तयार नाही. त्यामुळे शेतातील टरबूज तसेच राहू नये, यासाठी शेतकऱ्यांनी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून यामाध्यमातून टरबूज विक्री सुरू केली आहे. सध्या पाच रुपये प्रती किलो प्रमाणे विक्री केली जात आहे. सध्या रमजान महिना सुरू झाला असून टरबूज विक्री होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनादेखील दिलासा मिळाला असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.