coronavirus - भंडारा जिल्ह्याकडे पायी निघालेल्या सहा मुली परळी येथे क्वारंटाइन 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

नगरहून-नांदेडकडे सात प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका बोलेरो वाहनाच्या चालकास सिरसाळा गावातील परळी-बीड चेकपोस्टवर अडविण्यात आले. सर्व महिला प्रवाशांची आरोग्य तपासणी करून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले. परळी येथील वैद्यनाथ मंदिराच्या भक्तनिवासात त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली.

सिरसाळा (जि. बीड) - नगरहून-नांदेडकडे सात प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका बोलेरो वाहनाच्या चालकास सिरसाळा गावातील परळी-बीड चेकपोस्टवर बुधवारी (ता.१५) पहाटे दोनच्या सुमारास अडविण्यात आले. 

याबाबत माहिती अशी, की रांजणगाव येथे कंपनी काम करणाऱ्या सहा मुली भंडारा या आपल्या मूळगावी जाण्यासाठी नगर जिल्ह्यातील पाथर्डीपर्यंत पायी आल्या होत्या. यानंतर पाथर्डी येथून बोलेरो वाहनात (एमएच-१२ जेयू-३१४९) बसल्या. वाहनाचा चालक गोवर्धन दशरथ लोखंडे (रा. राळेगणमसोबा) आपल्या मित्रांसह सहा महिला प्रवाशांना घेऊन नांदेडला सोडवण्यासाठी जात होता. त्यांना सिरसाळा चेकपोस्टवर अडवण्यात आले. कोरोना विषाणू रोखण्यासाठी संचारबंदी असताना प्रवास केल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे पोलिस अधिकारी श्रीकांत डोंगरे यांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवला.

आई गेल्याचं दुःख मोठं, पण गोडजेवण घालण्याऐवजी यांनी...

सर्व महिला प्रवाशांची आरोग्य तपासणी करून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले. परळी येथील वैद्यनाथ मंदिराच्या भक्तनिवासात त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली. पोलिस जमादार मिसाळ तपास करीत आहेत. दरम्यान, या मुली घाबरून गेल्या. आम्हाला अलगीकरण कक्षात न ठेवता परत जाऊ द्या, असा हट्टहास त्यांनी प्रशासनासमोर केला. 

विनापरवानगी प्रवास, १६ जणांवर गुन्हा 
शिरूर कासार - तालुक्यातील घाटशिळ पारगाव येथे मुंबई कल्याण येथून विनापरवाना ट्रकमध्ये बसून प्रवास करून सोमवारी (ता.१३) दाखल झालेल्या सोळा व्यक्तीसह वाहनावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील घाटशिळ पारगाव येथे मुंबई कल्याण येथील रहिवासी असलेले सोळा जण ट्रकमध्ये बसून आपल्या मूळ गावी आल्याची खबर येथील तलाठी नामदेव पाखरे, ग्रामसेवक बडे यांना लागताच त्यांनी सानप वस्तीवर जाऊन तपासणी केली.

पळून गेलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी...

कोरोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा बंदी, संचारबंदी लागू असताना ट्रक (एम एच ०५ ए.एम.९७८५) व टॅम्पोने (एम एच-२०-७२१४) या वाहनाने प्रवास केला. वाहनासह सोळा जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, कोरोना प्रतिबंधात्मक कायदानुसार तलाठी नामदेव पाखरे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the way to Bhandara district Quarantine six girls in parali