esakal | लग्नात वऱ्हाडींची गर्दी भोवली; वधू-वर पित्यांवर दंडात्मक कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

corona

लग्नात वऱ्हाडींची गर्दी भोवली; वधू-वर पित्यांवर दंडात्मक कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गेवराई (बीड): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध असताना देखील तालुक्यातील बोरीपिंपळगाव व बेलगाव या दोन ठिकाणी लग्न समारंभात ५० पेक्षा अधिक वऱ्हाडी जमवून लग्न समारंभ पार पडत असल्याची माहिती मिळताच गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांनी याठिकाणी जाऊन मंगळवारी दुपारी कारवाई केली. बोरीपिंपळगाव येथे मंगल कार्यालय मालक तर बेलगाव येथे वधू-वर पित्यांना प्रत्येकी दहा हजाराचा दंड त्यांनी केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून निर्बंध लावण्यात आलेले आहेत. यामध्ये लग्नसमारंभासाठी निर्देशानुसार ५० लोकांची परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु गेवराई तालुक्यात हे निर्बंध पायदळी तुडवीत लग्न समारंभ मोठ्या थाटात व अधिक नातेवाईक जमवून पार पडत आहेत. अशाच प्रकारे जास्त वऱ्हाडी जमवून व कोरोनाचे कुठलेही नियम न पाळता गेवराई तालुक्यातील बोरीपिंपळगाव व बेलगाव येथे लग्न समारंभ पार पडत असल्याची माहिती मंगळवारी गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांना मिळाली.

हेही वाचा: COVID-19| आष्टीतील रुग्णवाढीत घट तर बीड, गेवराईमध्ये रुग्ण वाढले

त्यानुसार तहसीलदार खाडे यांनी बोरीपिंपळगाव येथील माऊली मंगल कार्यालय याठिकाणी जाऊन पाहणी केली असता ५० पेक्षा अधिक लोकांची उपस्थिती होती. तसेच २० नागरिक हे विनामास्क उपस्थित होते. कोविडच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आल्याने त्यांनी संबंधित मंगल कार्यालय चालकाला दहा हजाराचा दंड केला. तसेच बेलगाव येथील दुसऱ्या कारवाईत देखील अशीच परिस्थिती होती. त्यामुळे येथे वधू-वर पित्यांना देखील दहा हजार रुपये दंड करण्यात आला.

loading image