‘सिमरन’ दिवस नक्की आहे तरी काय?

‘सिमरन’ दिवस नक्की आहे तरी काय?

नांदेड ः देशात शांती, संहिता, विश्वबंधुता, एकता आणि अखंडता अबाधित रहावी यासाठी २००७ पासून शिख धर्मियांकडून सिमरन सामुहिक (प्रार्थना) केली जाते. याच धर्तीवर नांदेड येथील गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजुरसाहिब येथे सामुहिक प्रार्थना शुक्रवारी (ता.१५) करण्यात येणार आहे. या ‘सिमरन’ दिवसाच्या निमित्ताने नांदेड येथील शीख समाजबांधव सज्ज झाले आहेत.


येथील गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजुरसाहिब येथे शुक्रवारी (ता.१५) विश्वशांती आणि बंधुत्व प्रस्थापित राहण्यासाठी सामुहिक प्रार्थना करण्यात येणार आहे. यासाठी ‘सिमरन’ दिवसाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी सिमरन कार्यक्रमात पंधरा मिनिटांचा मूलमंत्र पाठ उभारण्यात येणार आहे. वरील सामूहिक जप कार्यक्रम सायंकाळी सव्वाचार ते साडेचार दरम्यान होईल.

तख्त सचखंडचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी आणि पंचप्यारे साहिबान यांची या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे. शिवाय गुरुद्वारा बोर्डाचे पदाधिकारी, गुरुद्वारा बोर्डाचे सदस्य, अधिकाऱ्यांचीही उपस्थिती राहणार आहे. तसेच धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक आणि इतर क्षेत्रातील नागरिक, विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. साडेचार वाजता विश्वशांतीसाठी अरदास (प्रार्थना) होईल.


ज्या वेळी सायंकाळी सव्वाचार वाजता गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजुरसाहिब येथे सामूहिक जप कार्यक्रमास सुरुवात होईल, त्यावेळी संपूर्ण जगात ज्या-ज्या ठिकाणी गुरुद्वारा किंवा प्रार्थनास्थळ आहेत त्या ठिकाणी भाविक जप आणि सिमरन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. श्री गुरू नानकदेवजी महाराज यांचे हे ५५० वा प्रकाशपर्व वर्ष असल्याने या वेळी ‘सिमरन’ दिवसात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार असल्याचे संकेत आहेत.

‘सिमरन’ दिवस साजरा करण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी चहा, नाश्ता, मिष्ठान्नचा लंगर लावण्यात येणार आहे. वरील कार्यक्रमात सर्वधर्मीय भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक स. गुरविन्दरसिंघ वाधवा यांनी केले आहे.

का साजरा केला जातो सिमरन दिवस


देशात शांती, संहिता, विश्वबंधुता, एकता आणि अखंडता अबाधित रहावी यासाठी २००७ पासून शिख धर्मियांकडून सिमरन सामुहिक (प्रार्थना) केली जाते. या दरम्यान अनेक जाती-समुहाचे लोक एकत्र येऊन सामुहिक जप करतात. सिमरन प्रार्थनेत देश आणि विदेशात वसलेले सर्व धर्माचे लोक सहभागी होतात. इतकेच नव्हे तर कॅनडा, इंग्लड, अमेरिका सारख्या देशातदेखिल याच दिवशी तेथील गुरुद्वारात सिमरन हा प्रार्थना उत्सव त्या देशाच्या वेळेनुसार एकाच वेळी साजरा केला जातो.    

कुणी केली ‘सिमरन’ची सुरुवात


गुरुतागद्दीच्या वेळी माजी पोलिस महासंचालक डॉ. प्रवींदर सिंघ पसरिचा हे २००७ मध्ये नांदेड गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक (अध्यक्ष) होते. त्यांनी ‘सिमरन’ची सुरवात केली. आज सोहळ्यात नांदेडच्या गुरुद्वाऱ्यात पाठ सुरू होताच तो ‘पीटीसी’ या हिंदी वाहिणीवरुन एकाच वेळी देशभरात प्रक्षेपित केला जातो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com