चिमुकल्यांच्या आक्रमतेत का होत आहे वाढ? काय आहेत कारणे, ते वाचाच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

मोबाईल, रिमोट हिसकावला तर मुले घरातील साहित्याच्या फेकाफेकीसह हिंसक कृत्याकडेही मागेपुढे पाहात नसल्याने पालकांच्या जिवाला मोठा घोर लागला आहे.

नांदेड : गेल्या काही वर्षात चिमुकल्यांसाठी सुरू केलेल्या चॅनलवरील मालिकांमधून दाखविण्यात येणारी हिंसा, मोबाईलमधील वेगवेगळे गेम्स यामुळे घरातील चिमुकल्यांच्या आक्रमकतेत वाढ झाल्याचे दिसून येते. दिवाणखान्यात पडून एका हाती टीव्हीचे रिमोट तर कधी पालकांचा मोबाईल, असे चित्र प्रत्येक घरात दिसते. 

मुलांमध्ये वाढतोय एकलकोंडेपणा
शहरातील प्रत्येक घरातील दिवाणखान्यात पालकांऐवजी चिमुकल्यांचेच साम्राज्य दिसून येते. सकाळपासून सायंकाळपर्यंत विविध लहान मुलांसाठीच्या वाहिन्यांवर देशी मालिकांसह विदेशी मालिका हिंदीत अनुवादित करून दाखविल्या जात आहेत. लहान मुले या मालिकांचे चाहते आहेत. एवढेच नव्हे तर दहा वर्षांवरील मुलांमध्ये क्राईम पेट्रोल, सीआयडी, सावधान इंडियासारख्या मालिकातील साहस दृश्‍यांचेही आकर्षण आहे. यामुळे चिमुकले एका आभासी जगतात वावरत असल्याचे दिसून येते. यातून त्यांच्यात एकलकोंडेपणा वाढत असून, घरी पालकांचे ऐकण्याच्या मनःस्थितीत ते नसल्याचे घराघरांतील दृश्‍य आहे. 

हे वाचा - नांदेडच्या सायकलपटूंनी केली कमाल... वाचाच...

मुलांसाठी टीव्हीच झाले मुख्य साधन
अनेक मुले मालिकांमधील फाईटची दृश्‍ये बघून त्याच पद्धतीने वागण्याचा किंवा ती दृश्‍ये प्रत्यक्षात करण्याचा प्रयत्न करताहेत. त्यातच गेल्या दोन-तीन वर्षांत मोबाईलमधील गेम्सने मुलांना वेड लावले आहे. सध्या पबजीसारख्या गेमने चिमुकल्यांवर भुरळ घातली आहे. कधी टीव्हीचा रिमोट तर कधी मोबाईल, यातच चिमुकले रमत असल्याने बाहेर मैदान, उद्यानात फिरण्यास जाण्यासही ते नकार देत असल्याचे अनेक पालकांचे मत आहे. पालक नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेर जात असल्याने शाळेतून घरी आल्यानंतर मुलांसाठी एकमेव टीव्हीच मूळ साधन झाले आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - Video And Photos : लेकीचे लग्न भारतीय संविधानाला समर्पित - कसे ते वाचायलाच पाहिजे

पालकांनाही टाकले चिंतेत
अनेक शाळांनी मुलांसाठी विविध विषयाचे अॅप्स तयार केले असून रंजनात्मक अभ्यासाचा प्रयत्न सुरू केला. यातून पालक मुलांना मोबाईल देत आहेत. परंतु, काही वेळ अभ्यास केल्यानंतर मुले गेम्स सुरू करतात. शाळांचीही सक्ती असल्याने तसेच मुलांच्या कटकटीतून मोकळीक मिळावी, यासाठी मुलांना मोबाईल उपलब्ध करून दिला. पालकांनी मोबाईल हिसकावल्यास मुले तो फेकून देत आहेत, टीव्हीचा रिमोट हिसकावल्यास टीव्हीवर पाणी टाकणे आदीची धमकीच मुले देत असल्याने पालकांनाही चिंतेत टाकले आहे.

हे तुम्ही वाचाच - आॅनलाइन कामांमुळे वाढलाय मोबाईलचा वापर: काय होत आहे परिणाम ते वाचायलाच पाहिजे

तज्ज्ञ डॉक्टराचा सल्ला आवश्‍यक
मुलांमधील आक्रमकतेसाठी लहान कुटुंब असणे हे मुख्य कारण आहे. नोकरी व व्यवसायानिमित्त पालक मुलांना पाहिजे तसा क्‍वालिटी टाईम देऊ शकत नाही. मुलांची कटकट नको म्हणून त्याला मोबाईल किंवा रिमोट दिल्यास ती मुलांची सवय होऊन बसते. मुलांना नातेवाईक किंवा कार्यक्रम, उद्यानात घेऊन जाणे आवश्‍यक आहे. अति आक्रमकता असेल तर तज्ज्ञ डॉक्‍टरकडे दाखविणे आवश्‍यक आहे. मुलांचे समुपदेशन व औषधीद्वारे ते दूर करता येते.
- डॉ. प्रमोद वसंतराव पाटील, बालरोगतज्ज्ञ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why Aggression is Increasing in Children Nanded News