esakal | परभणी जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराकडे कानाडोळा का ?

बोलून बातमी शोधा

परभणी रुग्णालय
परभणी जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराकडे कानाडोळा का ?
sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः कोरोनाचे संकट जिल्ह्यावर आल्यापासून परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील ढिसाळ कारभाराचे एक एक किस्से जगजाहिर होत आहेत. या ढिसाळ कारभारामुळे रुग्णांचे जीव टांगणीला लागलेले असतांनाही यास कारणीभूत असणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई कशी होत नाही ? हे एक कोडेच आहे. केवळ बैठका घेवून व जिल्हा शल्यचिकित्सकांना धारेवर धरुन वेळ मारुन नेल्या जात आहे. यावरुनच जिल्हा रुग्णालयातील कारभाराला राजकीय पाठबळ मिळत आहे की काय ? असा प्रश्न समोर येत आहे.

परभणी जिल्हा रुग्णालयाचा कारभार आधीपासून ढिसाळ आहे. केवळ रुग्णालयातील कोणती घटना, माहिती ही कधी म्हणावी त्या वेगाने बाहेर पडली नाही. म्हणूनच आतापर्यंत या रुग्णालयातील कारभार हा रामभरोसे सुरु राहिला. परंतू कोरोनाचा संसर्ग सुरु झाला त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील कारभाराचे वाभाडे निघण्यास सुरुवात झाली. रुग्णालयातील कोणत्याही डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱ्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे कोरोना काळात स्पष्ट झाले आहे. या आधीही जिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर्स स्वताचा खासगी दवाखाना चालविण्यातच मग्न असल्याचे आपण सर्वच जण जाणतो. त्यामुळे याचा विपरित परिणाम रुग्णसेवेवर होतांना दिसतो. मंगळवारी (ता. 27) रात्री घडलेली घटना ही तर सर्वात दुर्देवी घटना होती. परंतू दैव बलवत्तर म्हणून वेळीच उपाय योजना झाली व पुढील अनर्थ टळला. नाशिकच्या घटनेवरून परभणीतील अधिकाऱ्यांनी बोध घेतला नसल्याचे या घटनेवरून दिसते.

हेही वाचा - हिंगोलीत सलग तिसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण; हळद काढणीस व्यत्यय

रुग्णालयात असे घडले किस्से

फेब्रुवारी महिण्यात जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागासह लॉन्ड्रीला आग लागली. बालरुग्ण कक्षातील छताचे प्लास्टर कोसळले. मागच्या वर्षी चक्क ऑक्सिजनची पाईप लाईनच चोरीला गेली. ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला. याच रुग्णालयातील स्टाफ नर्सने रुग्णालयातुन रेमडेसिव्हिर इंजेक्शन चोरले आणि साथीदारांच्या मदतीने चढ्या भावाने विक्री करतांना सापडली. आता उघड्यावर असलेल्या ऑक्सिजन पाईप लाईनवर झाड कोसळले. या घटना गंभीर स्वरूपाच्या आहेत. यातील जवळपास सर्वच घटनाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती नेमली. परंतू त्याचा अहवाल गुलदस्त्याच राहिला आहे.

राजकीय अभय मिळतय का ?

जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनामध्ये कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कामात सुधारणा होत नाही. रुग्णालयात घडणाऱ्या घटनांना जिल्हा शल्य चिकित्सकांचा बेजबाबदारपणा प्रथमदर्शनी दिसून येतो. पालकमंत्र्यांनीही जिल्हा शल्यचिकित्सकांवर कारवाई करण्याच्या प्रश्नाला बगल देण्याचे काम केले. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांना राजकीय अभय मिळतयं का ? असा प्रश्न आता सर्वसामान्यातून समोर येत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे