Coronavirus : का होत आहे, जालन्याची औरंगाबादकडे वाटचाल..! 

Aurangabad news
Aurangabad news

जालना : लॉकडाउनच्या अडीच महिन्यांनंतरही कोरोनाचा प्रसार थांबण्याचे नाव घेण्यास तयार नाही. मराठवाड्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. त्यापाठोपाठ आता जालना जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे द्विशतक पूर्ण झाले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत जालना जिल्ह्याची वाटचाल ही औरंगाबादच्या दिशेने सुरू झाल्याचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे ‘रेड झोन’मधून जिल्ह्यात आलेले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ११४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने काही दिलासाही मिळाला आहे. 


राज्यात कोरोनाची एंट्री झाल्यानंतर ता. २२ मार्चपासून लॉकडाउन लागू करण्यात आले होते; मात्र या लॉकडाउनमध्येही ‘रेड झोन’मधील अनेक नागरिक राज्याच्या कानाकोपऱ्यात आपल्या गावी परतल्याने त्यांच्यासोबत कोरोनाचा प्रसारही झाला आहे. हीच परिस्थिती मराठवाड्यात निर्माण झाली आहे. आज मराठवाड्यात औरंगाबाद येथे सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. औरंगाबादपाठोपाठ जालन्यात कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याचे चित्र आहे. आजघडीला जालन्यात एकूण २०५ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर ११४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, पाचजणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

‘रेड झोन’मधून आलेल्यांनी वाढविले टेन्शन, काळजी घेणे गरजेचे 

जालना जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे ‘रेड झोन’मधून आलेले नागरिक आहेत. एकट्या मुंबई येथून परतलेले तब्बल ८४ जण कोरोनाबाधित झाल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. मालेगाव बंदोबस्तावरून परतलेले राज्य राखीव दलाचे १२ जवानही कोरोनाबाधित झाले होते. त्याचप्रमाणे, दिल्ली-हैदराबाद, परभरणी, नांदेड, नागपूरमार्गे छत्तीसगड, सिंदखेडराजा, सुरत अशा विविध ठिकाणांच्या प्रवासाची पार्श्वभूमी असलेले शेकडोजण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. 

उचलावी लागणार कडक पावले 
‘रोड झोन’मधून आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. दुसरीकडे त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण होत आहे. विशेष म्हणजे आजही मुंबई, पुण्यासारख्या ‘रेड झोन’मधून नागरिकांचे जिल्ह्यात येणे सुरूच आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आता प्रशासनाला कडक पावले उचलावी लागणार आहेत; अन्यथा कोरोनाच्या प्रसारासंदर्भात जालन्याचे औरंगाबाद होण्यास वेळ लागणार नाही. 


जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अनेक रुग्ण हे इतर जिल्ह्यांतून आलेले आहे. जवळपास ११० रुग्ण हे इतर जिल्ह्यांतून जालना जिल्ह्यात आलेले होते. मालेगाव बंदोबस्तावरून परतलेले जवानही कोरोनाबाधित झाले होते. आतापर्यंत ११४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा चाचणीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण दिसून येत आहेत. 
रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी, जालना. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com