लोकांच्या जिवाशी खेळ का करता?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जुलै 2016

औरंगाबाद - रस्ता ही ट्रॅव्हल्सवाल्यांची मालकी नाही. रात्री सत्तर ते ऐंशीच्या वेगाने सुसाट ट्रॅव्हल्स धावतात. प्रवाशांच्या किमती वस्तू चोरी होतात. बस कोठेही उभी करून प्रवासी भरले जातात, दारू पिऊन वाहने चालवतात, लोकांच्या जिवाशी का खेळत आहात? नियमपालन केले नाही तर शहरात येण्यास मज्जाव करून कठोर कारवाई करावी लागेल, असा सज्जड दम पोलिस आयुक्तांनी ट्रॅव्हल्समालक-बुकिंगवाल्यांना दिला.

औरंगाबाद - रस्ता ही ट्रॅव्हल्सवाल्यांची मालकी नाही. रात्री सत्तर ते ऐंशीच्या वेगाने सुसाट ट्रॅव्हल्स धावतात. प्रवाशांच्या किमती वस्तू चोरी होतात. बस कोठेही उभी करून प्रवासी भरले जातात, दारू पिऊन वाहने चालवतात, लोकांच्या जिवाशी का खेळत आहात? नियमपालन केले नाही तर शहरात येण्यास मज्जाव करून कठोर कारवाई करावी लागेल, असा सज्जड दम पोलिस आयुक्तांनी ट्रॅव्हल्समालक-बुकिंगवाल्यांना दिला.

शहरात नियोजित वेळेतच ट्रॅव्हल्सना प्रवेश आहे. मात्र, नियमभंग करून सर्रास ट्रॅव्हल्स शहरात येतात. ठिकठिकाणी प्रवासी भरतात. यामुळे वाहतुकीवर मोठा ताण पडत असून रात्रीच्या वेळी बेफाम व सुसाट ट्रॅव्हल्स धावतात. या बाबींवर लक्ष केंद्रित करून पोलिस विभागाने ट्रॅव्हल्स असोसिएशनची आयुक्तालयात सोमवारी (ता. चार) बैठक घेतली. बैठकीत आयुक्तांनी नियमभंग करणारांना चांगलेच सुनावले. एपीआय कॉर्नर, वसंतराव नाईक महाविद्यालय ते सिडको परिसर, मुख्य चौकात ट्रॅव्हल्सची भाऊगर्दी खपवून घेतली जाणार नाही. नियमभंग केला तर शहरातही प्रवेश बंद करू, उच्च न्यायालयासमोर तसेच विविध ठिकाणी ट्रॅव्हल्स पार्क करता येणार नाहीत. ट्रॅव्हल्सना जागा दिली, तेथे वाहतूक कोंडी होणार नाही ही जबाबदारी तुमची आहे. तुमची मुजोरी सहन करणार नाही, अशा शब्दांत कानउघाडणी करून पोलिस आयुक्तांनी ट्रॅव्हल्समालक-बुकिंग करणारांना नियमपालन करण्याचा दम दिला. या बैठकीत प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके, पोलिस उपायुक्त संदीप आटोळे, सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, सी. डी. शेवगण, निरीक्षक अविनाश आघाव, अशोक मुदीराज आदी उपस्थित होते.

व्हॉट्‌स ऍपवर द्या माहिती
ट्रॅव्हल्सवाले नियमभंग करीत असतील, असोसिएशनचे ऐकत नसतील तर असोसिएशनने व्हॉटस्‌ ऍप ग्रुप तयार करावा. अशा ट्रॅव्हल्सचालक-मालकांची माहिती व्हॉट्‌स ऍपवरून कळवावी. त्यांच्यावर आम्ही कारवाई करू, असेही पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी ट्रॅव्हल्स असोसिएशनला सांगितले.

मुजोरी सहन करणार नाही
तुम्ही समाजसेवा करीत नाहीत, लोकांकडून पैसे घेता, त्यांचे सामान कसे गायब होते? सर्व चालकांची व धावणाऱ्या ट्रॅव्हल्सची माहिती द्यावी. अवास्तव प्रवासी भरून मालवाहतूकही करता पण त्यांची काळजी घेत नाही. जबाबदारी झटकून चालणार नाही. मुजोरी सहन केली जाणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत ट्रॅव्हल्सवाल्यांचे आयुक्तांनी कान टोचले.

आयुक्त म्हणाले...
भरधाव सुसाट वाहनांमुळे जालना रस्त्यावरून जीव मुठीत धरून पादचाऱ्यांना जावे लागते. रात्रीच्या वेळी दारू पिऊन चालक ट्रॅव्हल्स सुसाट पळवतात. त्यांना ना अपघाताची तमा ना नियमांचे भय. सात चालक दारू पिऊन ट्रॅव्हल्स चालविताना पोलिसांच्या तपासणीत सापडले. पाच महिन्यांत अडीचशेवर दारू पिऊन वाहन चालवणारे सापडले आहेत.

अपघातासाठी वेग आणि दारू मोठी गंभीर समस्या असून अपघाताचे गुन्हे दाखल झालेल्या चालकांची यादी तयार करून द्यावी. ते कोणत्याही परिस्थितीत नोकरीवर राहता कामा नये.

दारू पिऊन ट्रॅव्हल्स चालवत असतील तर अशांचा परवानाच रद्द करण्यात येईल. चाळीसच्या सरासरीत जालना रस्त्यावरून ट्रॅव्हल्स न्यावीत. उच्च न्यायालयासहित जालना रस्त्यावर ट्रॅव्हल्स थांबायला नकोच.

ट्रॅव्हल्समधून सोन्याचे दागिने, साहित्य चोरीचे प्रकार सुरू आहेत. तुम्हाला प्रवाशांच्या सुरक्षेची तमा नाही. तुम्ही त्यांना मदतही करीत नाही. ट्रॅव्हल्समध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे सांगूनही बसवले नाहीत. एक ऑगस्टपासून तपासणी करू. सीसीटीव्ही नसल्यास गय होणार नाही.

ट्रॅव्हल्सप्रमाणेच बसेसही महावीर चौकालगत थांबतात. त्यामुळे अन्य वाहनांची कोंडी होत आहे. महावीर चौकालगत बस थांबवली तर अशा चालकांवर एसटीने कारवाई करावी.

Web Title: Why people life play the game?