पत्नीची आत्महत्या, पतीस सक्तमजुरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

सतत दारू पिऊन येणाऱ्या पतीच्या छळाला कंटाळून सारिका जाधव हिने आत्महत्या केली. या प्रकरणात पती संतोषविरुद्ध आष्टी तालुक्‍यातील अंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.

बीड - सतत दारू पिऊन पत्नीस त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीस दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (पाचवे) डी. एन. खडसे यांनी सुनावली. संतोष बलभीम जाधव (रा. धानोरा, ता. आष्टी) असे आरोपीचे नाव आहे.

धानोरा (ता. आष्टी) येथील संतोष जाधव हा दररोज दारू पिऊन येऊन पत्नी सारिकाला मानसिक आणि शारीरिक त्रास देत असे. नातेवाइकांनी समजावून सांगूनही त्याच्या वागण्यात काही फरक पडला नाही. 19 जुलै 2018 रोजी संतोष दारू पिऊन आला आणि पत्नी सारिकाला मारहाण केली. संतोषच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून सारिकाने स्वतःला पेटवून घेतले. गंभीर भाजलेल्या सारिकाचा नगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सारिकाने दिलेला मृत्युपूर्व जबाब आणि तिचा भाऊ अजिनाथ गायकवाड यांच्या फिर्यादीवरून संतोष जाधव याच्याविरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणात सरकारी पक्षाकडून नऊ साक्षीदार तपासण्यात आले.

यानंतर न्यायालयाने संतोष जाधव यास दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे ऍड. भागवत राख यांनी काम पाहिले. त्यांना कोर्ट पैरवी जमादार व्ही. व्ही. नागरगोजे व व्ही. डी. बिनवडे यांनी मदत केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife commits suicide, husband forced