पत्नीचा खून करून पळणारा अभियंता अपघातात ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - पोटगीच्या वादातून घटस्फोटित पत्नीचा सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या पतीने शुक्रवारी (ता.11) सायंकाळी खून केला. खुनानंतर पळ काढत असताना लासूर स्थानकानजीक शिंदी सिरसगाव परिसरात मोटार उलटून तो गंभीर जखमी झाला. रात्री साडेबाराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

औरंगाबाद - पोटगीच्या वादातून घटस्फोटित पत्नीचा सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या पतीने शुक्रवारी (ता.11) सायंकाळी खून केला. खुनानंतर पळ काढत असताना लासूर स्थानकानजीक शिंदी सिरसगाव परिसरात मोटार उलटून तो गंभीर जखमी झाला. रात्री साडेबाराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

अश्‍विनी मनोज गुरुळे (रा. औरंगाबाद, वय 30) असे खून झालेल्या महिलेचे; तर मनोज गुरुळे असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. मनोज हा पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे. आठ वर्षांपूर्वी अश्‍विनीचा मनोजशी विवाह झाला होता. त्यांना चार वर्षांची एक मुलगी आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर पोटगीचा वाद सुरू होता. त्यातून त्याने अश्‍विनीला संपवायचा बेत आखला.

अश्‍विनीचे वडील, आई व भाऊ सिन्नर येथे गेल्याने ती एकटीच घरी असल्याची माहिती त्याला समजली. काही साथीदारांसह तो औरंगाबादेत आज मोटारीने आला. सायंकाळी अश्‍विनी घराचा दरवाजा उघडत असतानाच मनोजने तिच्या हातावर, गळ्यावर वार करून तिचा खून केला. यानंतर तो वैजापूर महामार्गावरून भरधाव जात असताना त्याचे नियंत्रण सुटले आणि मोटार तारांचे कुंपण तोडून शेतात घुसली. अपघातात मनोज मागच्या काचेतून बाहेर फेकला गेला. गंभीर जखमी अवस्थेतील मनोजला घाटीत दाखल केले. रात्री साडेबाराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची माहिती निरीक्षक कल्याणकर यांनी दिली. मनोजविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्याच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

आईला पप्पाने मारले...
डोळ्यांदेखत वडिलांनीच आईचा खून केल्यानंतर त्यांची मुलगी जिवाच्या आकांताने ओरडतच बाहेर आली. त्या वेळी आजूबाजूचे लोक जमा झाले. दरम्यान, पोलिसांनी तिला विचारणा केली असता, आईला पप्पाने मारल्याची माहिती तिने दिली.

Web Title: wife murder by engineer