पत्नीचा मृतदेह सापडला, पतीचा शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 June 2020

कळमनुरी येथून कुंडलिक आसोले व त्यांच्या पत्नी धुरपताबाई असोले (रा. असोलवाडी) बैलगाडीमधून शेतातील आखाड्यावर जात असताना शुक्रवारी (ता.१९) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली.

कळमनुरी (जि. हिंगोली): ओढ्याला आलेल्या पुरात बैलगाडीसह वाहून गेलेल्या शेतकरी दांपत्यापैकी शनिवारी (ता.२०) सकाळी महिलेचा मृतदेह आढळून आला. दुसरा मृतदेह हाती लागला नसून प्रशासन, नागरिकांतर्फे शोध घेतला जात आहे.

कळमनुरी येथून कुंडलिक आसोले व त्यांच्या पत्नी धुरपताबाई असोले (रा. असोलवाडी) बैलगाडीमधून शेतातील आखाड्यावर जात असताना शुक्रवारी (ता.१९) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली. या दोघांचा रात्री उशिरापर्यंत पोलिस प्रशासन व नागरिकांनी शोध घेतला.

हेही वाचापोलिस मुख्यालयातच कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या -

धुरपतबाई असोले यांचा मृतदेह आढळला

 शनिवारी सकाळी असोलवाडी, कळमनुरी, ढोलक्याची वाडी भागातील नागरिक व मच्छिमारांनी पोलिस निरीक्षक रणजित भोईटे यांच्यासमवेत शोध मोहीम हाती घेतली. या वेळी पुयना तलावाला मिळणाऱ्या ओढ्याच्या तोंडाजवळ धुरपतबाई असोले यांचा मृतदेह आढळून आला.

पोलिस पथकासह नागरिकांना घेतला शोध

त्यानंतर कुंडलिक असोले यांचा शोध घेण्याचे प्रयत्न चालविले. मात्र बेशरम वनस्पतीच्या जाळ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. पोलिस निरीक्षक रणजित भोईटे, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, कर्मचारी गणेश सूर्यवंशी, सुनील रिठे, विकी ऊरेवार, नायब तहसीलदार श्रीराम पाचपुते, गंगाराम बेले यांच्यासह परिसरातील नागरिक व मच्छिमारांनी तलावामध्ये शोध घेतला.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाची मदत नाहीच

 मात्र बेपत्ता कुंडलिक आसोले यांचा शोध लागला नाही. त्यातच दुपारी पावसाने हजेरी लावल्याने शोध मोहीम काही वेळ थांबविण्यात आली. घटनास्थळी तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली. या घटनेची माहिती त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली आहे. मात्र तेथून कुठलीही मदत उपलब्ध झाली नाही.

सायंकाळी उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

 याशिवाय पुणे येथील एनडीआरएफ मदत पथकालाही घटनेची माहिती देत मदत मागितली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. दरम्यान, धुरपतबाई असोले यांच्या मृतदेहावर असोलवाडी या त्यांच्या गावात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार आटोपून गावकरी मंडळी कुंडलिक असोले यांच्या शोधासाठी रवाना झाले आहेत.

येथे क्लिक कराहिंगोली जिल्ह्यातील अकरा गावे ठरली हॉटस्‍पॉट -

डिग्रस कऱ्हाळे येथे दोन घरे फोडली

हिंगोली : तालुक्‍यातील डिग्रस कऱ्हाळे येथे चोरट्यांनी दोन घरी धाडसी चोरी करून ९७ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शुक्रवारी (ता.१९) पहाटे उघडकीस आली.
डिग्रस कऱ्हाळे येथे रामकिशन दत्तराव शेळके यांच्या घराच्या चॅनल गेटचे कुलूप व पाठिमागील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील नगदी ७० हजार रुपये लांबविले. 

९७ हजारांचा मुद्देमाल लांबविला

त्यानंतर जेजेराम कऱ्हाळे यांच्या घराच्या गेटचे कुलूप तोडून त्‍यांच्या घरात प्रवेश करत अंदाजे २७ हजार रुपये किमतीचे १८ ग्रॅम सोन्याचे दागीने असा एकूण ९७ हजारांचा मुद्देमाल लांबविला. या प्रकरणी रामकिशन शेळके यांनी शुक्रवारी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एस. पी. चव्हाण करीत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife's Body Found, Search For Husband Continues Hingoli News