प्रेमविवाहानंतरही पत्नीचे तुकडे-तुकडे करून ठेवले फ्रीजमध्ये, तिच्यासाठी धर्मही बदलला होता

कमलेश जाब्रस
सोमवार, 9 डिसेंबर 2019

बीड जिल्ह्यातील एका निर्दयी पतीने घरगुती कुरबुरीतून पत्नीचा खून केला. तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवून तो मुलांसोबत दहा दिवस घरात राहिला. अखेर दहा दिवसांनी हा प्रकार उघड झाला आहे. या घटनेने माजलगाव शहरात खळबळ उडाली आहे.

माजलगाव (जि. बीड) - सततच्या भांडणाला कंटाळून पत्नीचा खून करून तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवून पती मृतदेहासोबत दोन मुलांना घेऊन तब्बल दहा दिवस राहिला. अखेर दहाव्या दिवशी हा खुनाचा प्रकार उघडकीस आला असून, पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना माजलगाव शहरातील अशोकनगर भागात घडली आहे. 

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील अशोकनगर भागात राहणाऱ्या संजय साळवे व इंदिरानगर भागात राहणारी रेश्‍मा पठाण यांचे कॉलेजजीवनापासून प्रेमसंबंध होते. त्यांनी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन लग्न केले होते. संजयने मुस्लिम धर्म स्वीकारला.

नंतर तो "अब्दुल रहेमान' या नावाने फातेमानगर, मंजरथ रोड येथे वास्तव्य करत होता. या दांपत्यास दोन अपत्ये आहेत. सोमवारी सकाळी अशोकनगरमध्ये नाल्याच्या कडेला अर्धवट जळालेला मानवी सांगाडा आढळून आला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले व तपास सुरू केला. 

हेही वाचा - सेक्‍ससाठी तीन हजारांचा रेट; या शहरातील मॉल व्यवस्थापकासह एजंट, वारांगना अटकेत 

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी संशयित स्थितीत दिसून आला. रेश्‍मा आठ दिवसांपासून बेपत्ता असल्याचे पोलिसांना कळाले. त्यावरून पोलिस निरीक्षक सुलेमान यांनी तपासाची चक्रे फिरवून संजय साळवे ऊर्फ अब्दुल रहेमान यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता आठ दिवसांपूर्वी 30 नोव्हेंबरला पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची कबुली त्याने दिली.

जाणून घ्या - पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम?

पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन तपासणी केली असता घरात जाळपोळ केल्याचे दिसून आले, तर फ्रीजमध्ये तिच्या शरीराच्या कमरेखालील भागाचे तुकडे आढळून आले. हा प्रकार गंभीर असल्याने अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांनीही घटनास्थळी भेट दिली. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife's murder by husband