पत्नीचा खून, पतीला जन्मठेप

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

नांदेड : मुलगा होत नसल्याच्या कारणावरुन पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला ठार मारणाऱ्या पतीला प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकीया यांनी शुक्रवारी (ता. आठ) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

नांदेड : मुलगा होत नसल्याच्या कारणावरुन पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला ठार मारणाऱ्या पतीला प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकीया यांनी शुक्रवारी (ता. आठ) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

किनवट तालुक्यातील बेल्लोरी येथील सत्यवृत्त शंकर गारोळे याच्यासोबत विवाहिता सत्यभामा हिचा सोळा वर्षापूर्वी विवाह झाला होता. विवाहनंतर या दाम्पत्याना चार कन्यारत्न जन्माला आल्या. परंतु आम्हाला वंशाचा दिवा पाहिजे म्हणून सत्यभामा हिला त्रास देणे सुरू केले. पती व अन्य नातेवाईकांकडून सत्यभामाचा सतत शारिरीक व मानसीक छळ होत असे. दारु पीऊन सत्यभामाला तिचा पती मारहाण करित असे. याच कारणावरुन ता. नऊ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास राहत्या घरी पती सत्यवृत्त गारोळे (वय ४२) याने त्याची पत्नी सत्यभामा हिच्याशी वाद घातला. एवढेच नाही तर तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. शरिराला लागलेल्या आगीमुळे ती अंगणात सैरावैरा पळत सुटली. 

यावेळी शेजाऱ्यांनी तिच्या अंगावर गोधडी टाकून आग विझविली. या घटनेत सत्यभामा ही ९४ टक्के भाजली. तिला पुढील उपचारासाठी जलधारा प्राथमीक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉ. मिश्रा यांनी तिच्यावर प्राथमीक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी तिचे वडिल श्रावण हुरदुके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन किनवट पोलिसांनी पतीविरुध्द खून व विवाहितेचा छळ प्रकरणी पती, सासरा आणि सासुवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

तपास करणारे पोलिस निरिक्षक डॉ. अरुण जगताप आणि फौजदार अण्णाराव वडारे यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या प्रकरणात न्यायालयाने १२ साक्षीदार तपासले. यामध्ये जळीत विवाहितेचा मृत्यूपुर्व जबाब पोलिस हवालदार एम. आर. वाघमारे यांनी घेतला तो महत्वाचा ठरला. या प्रकरणादरम्यान सासरा यांचा मृत्यू झाला तर सासु फितुर झाली. आरोपी पतीला प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षाची बाजु अ‍ॅड. एम. ए. बत्तुला (डांगे) यांनी सांभाळली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife's murder, life imprisonment to husband