लातूरात भाजप पुन्हा 'करून दाखवणार का'?

लातूरात भाजप पुन्हा 'करून दाखवणार का'?

लातूर : मुख्यमंत्र्यांनी गाजवलेल्या सभा आणि कामगार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी घेतलेल्या मेहनतीच्या जोरावर जिल्ह्यात भाजपने निलंगा, उदगीर या दोन नगरपालिकेची सत्ता मिळवली. कॉंग्रेसमुक्त भारतचा नारा देणाऱ्या भाजपने "लातूर मुक्त कॉंग्रेस'च्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल म्हणून नगरपालिकांच्या या निकालाकडे पाहिले गेले. असंतुष्टांना हाताशी धरुन भाजपने कॉंग्रेसला चांगलाच "हात' दाखवला होता. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप पुन्हा हे करुन दाखवणार का? याचीच चर्चा लातूरात सध्या सुरु आहे.

 महापालिकेतील अनागोंदी कारभार, आमदार अमित देशमुख यांच्या हाताबाहेर गेलेली परिस्थीती पाहता सत्ता राखतांना कॉंग्रेसची दमछाक होणार असे दिसते. तर नगरपालिकेतील विजयाचे टॉनिक घेऊन ताकदवान झालेल्या भाजपाची मदार देखील आयात केलेल्या उमेदवारांवरच अवंलबून असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. 

विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक आणि अहमदपूरचे अपक्ष आमदार विनायक पाटील यांनी नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांसह नुकताच भाजपात प्रवेश करुन वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत याचा संदेश काठावर असलेल्यांना दिला आहे. या शिवाय शिरूर अनंतपाळ तालुक्‍यातील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संभाजी पाटील यांनी नगरपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांना हातात कमळ घेतले आहे.  निलंगा, उदगीर नगरपालिकेत कमळ उमलल्यानंतर विनायक पाटलांच्या भाजप प्रवेशाने अहमदपूर नगरपालिकेवर  वर्चस्व निर्माण केले आहे . सध्या इनकमिंगमुळे भाजपडे उमेदवारांची वानवा नाही. पण इतर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सामवून घेतांना स्वपक्षीयांवर अन्याय होणार नाही याची काळजी देखील पक्षनेतृत्वाला घ्यावी लागणार आहे . 

भाजपचे लक्ष फोर्टी प्लस 
2012 च्या जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाचा विचार केला तर 58 पैकी तब्बल 35 जागा जिंकत कॉंग्रेसने आपले वर्चस्व आणि बहुमत सिध्द केले होते. त्यामुळे एकहाती सत्ता राबवत कॉंग्रेसने पाच वर्ष कारभार पाहिला. भाजपचे 8 तर शिवसेनेचे 5 सदस्य त्यावेळी निवडून आले होते. सद्य राजकीय परिस्थीती, नगरपालिका निवडणूकीत कॉंग्रेसची झालेली वाताहत पाहता त्यांना पुर्वीची सत्ता व संख्याबळ कायम राखणे शिवधणुष्य पेलण्या सारखे होणार आहे. या उलट भाजपमध्ये होणारे प्रवेश, मिळालेले यश पाहता पालकमंत्री संभाजी पाटील यांनी 40 जागा जिंकण्याचे ध्येय निश्‍चित केले आहे. यासाठी भाजपला औसा, लातूर व रेणापूर या कॉंग्रेसचे प्राबल्य असलेल्या तीन तालुक्‍यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. 

धाकट्या देशमुखांची एन्ट्री 
जिल्ह्यातील कॉंग्रेसला घरघर लागलेली असतांनाच लातूर तालुक्‍यातील एकुर्गा जिल्हा परिषद मतदारसंघातून विलासरावांचे चिरंजीव धीरज देशमुख निवडणुकीच्या रिगणात उतरणार आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित असल्यामुळे थेट त्यावर दावा सांगण्यासाठी केलेली धाकट्या देशमुखांचे एन्ट्री कितपत यशस्वी ठरते हे लवकरच स्पष्ट होईल. भाजपने देखील धीरज देशमुख यांना एकुर्ग्यातच पराभूत करुन त्यांना घरी बसवण्याची जोरदार तयारी प्रचाराचा शुभारंभ इथूनच करत केली आहे. 

भविष्यात आपण काकांच्या सल्याशिवाय कोणताही राजकीय निर्णय घेणार नाही अशी ग्वाही आमदार अमित देशमुख यांनी एका जाहीर कार्यक्रमात दिली होती. त्यानूसार जिल्हा परिषदेत पुन्हा सत्ता कायम राखण्यासोबत धाकटे बंधू धीरज यांना निवडून आणण्यासाठी अमित देशमुश काका दिलीप देशमुखांना शरण गेले आहेत. कांकांनी देखील झालं गेलं विसरुन पुतण्याच्या मदतीसाठी कंबर कसली आहे. त्र्यंबक भिसे, बसवराज पाटील मुरुमकर आणि स्वःत अमित देशमुख जिल्हा परिषदेची धुरा वाहणार आहेत. पाच वर्षात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामाचा लाभ कॉंग्रेसला होईल अशी आशा कॉंग्रेसजन बाळगून आहेत. नोटाबंदी व शेतमालाला भाव हे दोन प्रमुख मुद्देच कॉंग्रेसच्या प्रचाराचे अस्त्र असणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com