प्रोत्साहन अनुदानाचे होणार का महाराष्ट्रात आगमन?

majur.jpg
majur.jpg

हिंगोली : झारखंड राज्याने घरकुलांचे बांधकाम एक वर्षाच्या आत पूर्ण होण्यासाठी सुरु केलेला स्वयंसेवकांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा प्रयोग राज्यातही सुरु करण्यासाठी राज्य शासनाकडे शिफारस करणार असल्याची माहिती हिंगोलीच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्पाधिकारी डॉ. पी.पी. घुले यांनी दिली आहे.

राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती मिळावी या  पार्श्वभुमीवर राज्य शासनाने झारखंड राज्यातील घरकुलांची पाहणी  करण्यासाठी राज्याचे पथक पाठविले आहे. यामधे अकोला येथील  मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रकल्प संचालक एच. आर. मिश्रा, बार्शी टाकळीचे गटविकास अधिकारी डॉ. संदीप भंडारे, हिंगोलीचे प्रभारी प्रकल्प अधिकारी डॉ. पी. पी. घुले, कळमनुरीचे गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी, ठाण्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी एच. डी. दोडके यांचा समावेश आहे.

मुरबाडचे गटविकास अधिकारी विश्वनाथ केळकर यांच्या पथकाने झारखंड राज्यातील गिरडोह, बोकारो, जमदेशपुर, हजारीबाग या भागात घरकुलांची पाहणी केली. त्या ठिकाणी घरकुल योजना कशा पध्दतीने राबवली जाते याचा अभ्यास देखील केला आहे. तसेच लाभर्थ्यांशी संवाद साधला आहे. हे पथक शुक्रवारपर्यंत (ता.१२) झारखंडमधे असणार आहे. 

या संदर्भात दुरध्वनीवरून बोलतांना डॉ. घुले म्हणाले की, "या भागात घरकुल योजनेमध्ये सर्व यंत्रणांचा सहभाग असतो. विशेष म्हणजे घरकुलाच्या बांधकामासाठी गावात स्वयंसेवक नियुक्त केला असून त्यांना मुदतीमधे घरकुल बांधकाम पूर्ण झाल्यानंतर प्रोत्साहन भत्ता दिला जातो. त्यामुळे झारखंडमधे घरकुलांची कामे त्या त्या वर्षातच पूर्ण होतात. शिवाय लाभार्थी देखील घरकुलाबाबत सतर्क असून मंजूरी मिळाल्यानंतर तातडीने कामाला सुरवात होते. गावपातळीवर अडचणी आल्यानंतर जिल्हा परिषद, महसुल विभाग यंत्रणा त्यांची सोडवणुक करीत असल्याचे चित्र आहे." 

या ठिकाणी पाहणी केल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे. त्यामधे महाराष्ट्रातही स्वयंसेवकांचा प्रयोग केल्यास त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. राज्यात लाभार्थ्यांना मजुरीला जावे का घरकुलाच्या अडचणींकडे पहावे हा प्रश्न भेडसावतो.

त्यामुळे  स्वयंसेवक नियुक्त केल्यास लाभार्थ्यांचे प्रश्नही सुटतील व गावपातळीवर रोजगारही उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे घरकुलांच्या कामांना गती येऊन लाभार्थ्यांना हक्काच्या घरकुलाचा आनंद मिळेल असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com