वंचित मुस्लिमांना सत्तेपर्यंत नेणार : प्रकाश आंबेडकर  

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

वंचित मुस्लिमांना सत्तेत न्यायिक वाटा देण्याची आमची तयारी आहे. मुस्लिम समाजानेही भावनेतून राजकारण करण्याऐवजी बौद्धिक बळाचा वापर करण्याची गरज आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. 

औरंगाबाद - वंचित मुस्लिमांना सत्तेत न्यायिक वाटा देण्याची आमची तयारी आहे. मुस्लिम समाजानेही भावनेतून राजकारण करण्याऐवजी बौद्धिक बळाचा वापर करण्याची गरज आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. 
वंचित बहुजन आघाडीतर्फे "मुस्लिम अजेंडा' या विषयावर आयोजित कार्यक्रमात ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात डॉ. गफ्फार कादरी, गोविंद दळवी, अमित भुईगळ, मौलाना सरवर, कासमी मुफ्ती शकील, अब्दुल रऊफ यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, की आज राज्यात मुस्लिम समाज असुरक्षिततेची भावना व्यक्त करत आहे. ही स्थिती 1980 नंतर झपाट्याने बदलली आहे. यापूर्वी अशी परिस्थिती नव्हती. या स्थितीला तथाकथीत सेक्‍युलर पक्ष जबाबदार आहे. तर काही अंशी मुस्लिम समाजही जबाबदार आहे. मुस्लिम समाजाने सवर्णांना मोठे करण्याचे काम केले, मात्र यावर आता विचार करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे मुख्य प्रवाहात येण्यासाठी शिक्षणालाही महत्त्व दिले पाहिजे. 

वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुक अहमद यांनी मुस्लिम समाजाचे विविध प्रश्‍न आगामी विधानसभा निवडणुकीच्या घोषणापत्रात समाविष्ट करण्याची मागणी केली. सूत्रसंचालन मोहम्मद कासीम यांनी केले. ऍड. शेख बिलाल यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. अब्दुल कदीर, सोहेल जलील, आदेश आटोटे, अक्रम खान, हाजी सईद खान, मोहसीन खान, इरफानभाई, इरफान शेख यांनी प्रयत्न केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will take Muslims to power : Adv. Prakash Ambedkar