वैजापूर तालुक्‍यात दारूच्या दुकानाची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

वैजापूर - शिऊर (ता. वैजापूर) येथील देशी दारू दुकान कायमस्वरूपी बंद करावे, या मागणीसाठी महिलांनी दारू दुकानावर बुधवारी मोर्चा काढून हल्लाबोल केला. महिलांनी दुकानाची तोडफोड करून दुकानाला टाळे ठोकले. दुकान पेटविण्याचा प्रयत्नही महिलांनी केला.

वैजापूर - शिऊर (ता. वैजापूर) येथील देशी दारू दुकान कायमस्वरूपी बंद करावे, या मागणीसाठी महिलांनी दारू दुकानावर बुधवारी मोर्चा काढून हल्लाबोल केला. महिलांनी दुकानाची तोडफोड करून दुकानाला टाळे ठोकले. दुकान पेटविण्याचा प्रयत्नही महिलांनी केला.

शिऊर येथील उपबाजारपेठेशेजारी परवानाधारक देशी दारू दुकान आहे. हे दुकान कायमस्वरूपी बंद करावे, यासाठी आधीही ग्रामपंचायतीने महिलांची विशेष ग्रामसभा घेऊन ठराव घेतला होता. आडव्या बाटलीच्या आधी देण्यात येणाऱ्या निवेदनावर महिलांच्या पुरेशा स्वाक्षऱ्या न झाल्याने पुढील कार्यवाही झालीच नाही. न्यायालयाच्या निर्णयाने महामार्गावरील दारूविक्री दुकाने बंद झाली; मात्र शिऊर येथील दुकान निर्धारित केलेल्या अंतरात येत असल्याने हे परवानाधारक दारू दुकान सुरू आहे.

गावातील 70 ते 80 महिलांनी आज दुपारी बाराच्या सुमारास दुकानावर हल्लाबोल केला. बॉक्‍समधील बाटल्या फोडून संताप व्यक्त केला. दुकानाला टाळे ठोकून फोडलेल्या बाटल्या पेटवून देत दुकान परिसरात जाळपोळीचा प्रयत्न केला. महिलांनी दुकानातील दारूड्यांनाही पिटाळून लावले. दुकानाची तोडफोड केल्यानंतर महिलांनी पोलिस ठाण्यात जाऊन ठिय्या मांडला.

ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव
शिऊर येथील परवानाधारक दारू दुकान बंद करण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला आहे. या ठरावाची प्रत व ग्रामपंचायतीमार्फत पोलिस अधीक्षक आरती सिंह यांना निवेदन देऊन दारू दुकान कायमस्वरूपी बंद करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सरपंच नितीन चुडीवाल यांनी सांगितले.

Web Title: wine shop damage