
अनधिकृत वीज वापराची तपासणी करण्यासाठी माझ्या घरी का आलास या कारणावरून वायरमनला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार बुधवारी (ता.१६) तालुक्यातील दैठणा येथे घडला.
आष्टी (जि.बीड) : अनधिकृत वीज वापराची तपासणी करण्यासाठी माझ्या घरी का आलास या कारणावरून वायरमनला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार बुधवारी (ता.१६) तालुक्यातील दैठणा येथे घडला. महावितरणतर्फे सध्या तालुक्यात एक गाव एक दिवस योजने अंतर्गत वीज देयक थकबाकी वसुली, विजबील दुरुस्ती, नवीन वीजजोडणी, अनधिकृत वीज वापराची तपासणी आदी कामे करण्यात येत आहेत. या मोहिमे अंतर्गत बुधवारी तालुक्यातील दैठणा येथे बाबासाहेब लक्ष्मण पुणेकर व रंजनाबाई बाबासाहेब पुणेकर यांच्या घराची स्थळ तपासणी करण्यासाठी महावितरणचे वायरमन बाबुराव रामचंद्र पांढरे व सहा कर्मचारी गेले असता वीजचोरी आढळून आली.
पथकाने घराची तपासणी केल्याचा राग धरून बाबासाहेब लक्ष्मण पुणेकर व रंजनाबाई बाबासाहेब पुणेकर या दाम्पत्याने बुधवारी सायंकाळी वायरमन बाबुराव पांढरे यांच्या घरी जाऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत वायरमन बाबुराव पांढरे यांनी आष्टी पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता.१७) सकाळी फिर्याद दिली असून
गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संपादन - गणेश पिटेकर