पैसे काढुन ठेवा बँका आठदिवस बंद

शिवचरण वावळे
Friday, 28 February 2020

ज्या ग्राहकांनी स्मार्ट व्यवहार करण्यावर भर दिला त्यांना नोट बंदीतही व्यवसाय आणि व्यवहारावर फारसा फरक पडला नव्हता. परंतू बँकांना सलग दोन तीन सुट्या येताच सामान्य ग्राहकांचे नियोजन फिस्कटते आणि पंचायत ठरलेलीच. मार्च महिण्यात सलग आठदिवस सुट्या येत असल्याने प्रत्येकालाच पैशाचे नियोजन करावे लागणार आहे. 

नांदेड : मार्च महिन्यात अनेक बँकांचे हिशोब किताब, वर्षाची ताळेबंदीची घाईगडबड सुरू असते. किंबहुना अनेक बँका फेब्रुवारीपासूनच कर्ज प्रक्रिया थांबवितात. संपूर्ण मार्च महिना त्यांची लगीनघाई सुरू असते. परंतु, याच महिन्यात सलग आठ दिवस बँक बंद राहणार असल्याने बँकेतील एकही कागद किंवा फाईलपुढे सकणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. या बंदमुळे मात्र, सामान्य ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडणार आहे. बँक बंद दरम्यानचे आताच नियोजन केल्यास अनेकांना या मनःस्तापासून सुटका मिळू शकते.

याविषयी माहिती देताना बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, आठ ते १५ मार्च दरम्यान बँकेचे काम पूर्णपणे बंद राहण्याची शक्यता आहे. असे असले तरी, युनियन बँक कर्मचारी फेडरेशन आॅफ इंडिया (BEFI) व आॅल इंडिया बँक कर्मचारी असोसिएशन (AIBEA) कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी शुक्रवारी २८ तारखेला वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतरच स्ट्राईक करायचा किंवा नाही याबद्दल निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. स्ट्राईकमुळे बॅंका आठ दिवस बंद राहिल्यास लघू उद्योजक, व्यापारी, रोजंदारी करणाऱ्या ग्राहकांनादेखील अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

हेही वाचा- विद्यार्थीनीसोबत चाळे, गेला तुरूंगात

असे करा नियोजन

सध्या अनेक ठिकाणी पेटीएम, स्वाईप मशीन, आॅनलाइन पेमेंट आणि डेबिट - क्रेडिट कार्डद्वारे पैशाची देवाण - घेवाण सुरू आहे. त्यामुळे बँकांनीदेखील खात्यातून रक्कम काढण्यासाठी काही मर्यादा घातल्या आहेत. आॅनलाइन व्यवहारावर भर दिला जात असला तरी आजही छोटे किराणा दुकान, फळभाज्या खरेदीसाठी बाजारात गेल्यास त्या ठिकाणी नगदी व्यवहार करावा लागतो. तेव्हा अशा वेळी आपल्या खिशात सुट्टे पैसे असणे गरजेचे आहे. अन्यथा निराशा होऊ शकते. म्हणून पुढील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील सुट्यांची शक्यता बघता आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे. रोजचा घरखर्चाचा आंदाज घेऊन त्या दृष्टिने आतापासून खात्यातून रक्कम काढून ठेवल्यास हवे त्या वेळी त्या पैशाचा वापर करता येऊ शकतो.

हेही वाचलेच पाहिजे- हिंगोली जिल्ह्यात गूढ आवाजाने ग्रामस्थ भयभीत

अशा आहेत सुट्या आणि संपाच्या तारखा

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आठ मार्चला रविवारची सुटी, सोमवारी होळी, दहा तारखेला धुलीवंदन, तर ११ ते १५ मार्च दरम्यान विविध बँक कर्मचारी संघटनेकडून विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी तीन दिवस संपावर जाणार असल्याचे संकेत कर्मचारी संघटनेकडून मिळत आहेत. तर १४ तारखेला दुसरा शनिवार आणि १५ तारखेला पुन्हा रविवार असल्याने सलग आठ दिवस बँकेला सुट्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना चेक वठविण्यापासून ते नगदी व्यवहार करण्यापर्यंत अनेक आडचणींचा सामना करावा लागणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Withdraw Money From Banks Closed For Eight Days Nanded News