प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावरच महिलेची प्रसूती

विकास पाटील
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

बनोटी (जि.औरंगाबाद) ः बनोटी (ता. सोयगाव) प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनागोंदी कारभार, त्यामुळे होणारा त्रास ही बाब नित्याचीच झाली आहे. रामभरोसे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावरच नायगाव (ता. सोयगाव) येथील महिलेची उघड्यावर प्रसूती करण्याची वेळ शुक्रवारी (ता. एक) एका आदिवासी कुटुंबावर ओढवली. आई, बाळाची तब्येत उत्तम आहे.

बनोटी (जि.औरंगाबाद) ः बनोटी (ता. सोयगाव) प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनागोंदी कारभार, त्यामुळे होणारा त्रास ही बाब नित्याचीच झाली आहे. रामभरोसे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावरच नायगाव (ता. सोयगाव) येथील महिलेची उघड्यावर प्रसूती करण्याची वेळ शुक्रवारी (ता. एक) एका आदिवासी कुटुंबावर ओढवली. आई, बाळाची तब्येत उत्तम आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्‍टरांसह कर्मचारी हजर नसल्याने रुग्णालयासमोर उघड्यावरच गावातील महिलांना आदिवासी महिलेची प्रसूती करावी लागली. प्रसूती झाल्यानंतर उपस्थित परिचारिकेने महिलेस एक सलाईन लावले व गोळ्या, औषधी देऊन तासाभरातच घरी पाठवून दिले. त्यामुळे आरोग्य केंद्राच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. एक महिन्यापूर्वी सदर महिला तपासणीकरिता आली असता रक्त कमी असल्याने डॉक्‍टरांनी पाचोरा येथील खासगी रुग्णालयात प्रसूती करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, या महिलेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ती जाऊ शकली नाही.

शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास प्रसूती वेदना वाढल्याने कुटुंबीय या महिलेस बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले. त्यावेळी आरोग्य केंद्रात एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. वेदना असह्य झाल्याने गर्भवती महिला नंदाबाई प्रेमला चव्हाण (वय 40) हिच्या मदतीला बनोटी येथील आजूबाजूच्या महिला धावून आल्या. गर्भवतीस प्रवेशद्वारात घेत साड्या, चादरी आडव्या लावल्या; परंतु प्रसूती कशी करावी याची माहिती नसल्याने नातेवाइकांनी डॉक्‍टर, परिचारिकेला भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत बोलावले. परिचारिका पोचण्यापूर्वीच महिला प्रसूत झाली होती. तिने एका गोंडस मुलास जन्म दिला आहे.

मी कार्यालयीन बैठकीसाठी औरंगाबादला आलेलो आहे. नेमणुकीवरील परिचारिकांना भ्रमणध्वनीवरून आरोग्य केंद्रात प्रसूतीकरिता पाठविले. तोपर्यंत महिला प्रसूत झाली होती. संबंधित परिचारिका, कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
डॉ. प्रदीप राजपूत,
आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बनोटी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman Delivery At Primary Health Centre