
आज दुसऱ्या दिवशी रविवारी (ता.२९) तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी येथे पुन्हा बिबट्याने एका महिलेवर हल्ला करून गंभीर जखमी केले.
आष्टी (जि.बीड) : आष्टी शहराजवळील मंगरूळ येथे बिबट्याने काल शनिवारी (ता.२८) माय-लेकावर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली असताना आज दुसऱ्या दिवशी रविवारी (ता.२९) तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी येथे पुन्हा बिबट्याने एका महिलेवर हल्ला करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात सुदैवाने महिला बचावली असली तरी मानेवर गंभीर जखमा झाल्या आहेत. शालनबाई शहादेव भोसले (वय ६०, रा. बोराडेवस्ती, पारगाव जोगेश्वरी) या महिलेवर आज रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला.
पारगावलगत बोराडे वस्ती असून, शालनबाई यांचे शेत वस्तीच्या जवळ आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास त्या गवत आणण्यासाठी रानात गेल्या होत्या. गवत कापत असताना बिबट्याने अचानक त्यांच्यावर झेप घेतली. या हल्ल्यात शालनबाई यांच्या मानेवर गंभीर जखमा झाल्या असून त्यांना तातडीने आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुडी, किन्ही या दुसऱ्या टोकाला असलेल्या गावानंतर त्याच्या विरुद्ध टोकाच्या आष्टी शहर व पारगाव जोगेश्वरी या गावातही बिबट्याचे हल्ले सुरू झाल्याने दहशत वाढत चालली आहे.
संपादन - गणेश पिटेकर