पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

औरंगाबाद - पाण्याच्या प्रश्‍नावर तोडगा निघत नसल्याने जनतेचा आक्रोश सुरूच असून, मंगळवारी (ता. १७) वॉर्ड क्रमांक आठमधील सुरेवाडी येथील संतप्त महिलांनी नगरसेवकाच्या घरी ठिय्या मांडला. त्यानंतर नगरसेवक सीताराम सुरे त्यांना सोबत घेऊन सिडको एन- सात येथील पाण्याच्या टाकीवर धडकले. दोन तास ठिय्या दिल्यानंतर महापौरांनी ४५ मिनिटांऐवजी एक तास पाणी देण्याचे आश्‍वासन दिल्याने या महिलांनी माघार घेतली.

सिडको भागात महापालिकेने तीन दिवसांआड पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. पाण्याची वेळ मात्र पूर्वीप्रमाणेच ४५ मिनिटांची आहे. त्यामुळे पाण्याची ओरड सुरू झाली आहे. सुरेवाडी येथील महिलांनी मुबलक पाणी मिळावे म्हणून सोमवारी (ता. १६) अर्ध्या रात्री नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरावर मोर्चा काढला. समजूत काढल्यानंतर त्या घरी गेल्या; मात्र सकाळी साडेआठ वाजताच पुन्हा सुमारे दीडशे महिलांनी त्यांचे घर गाठून ठिय्या दिला. त्यानंतर श्री. सुरे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, शाखाप्रमुख रमेश सूर्यवंशी, गणेश सुरे, संजय नवले हे महिलांना सोबत घेऊन एन- सातच्या जलकुंभावर आले. माहिती मिळताच महापौर नंदकुमार घोडेले जलकुंभावर दाखल झाले. या वेळी महिलांनी किमान एक तास पाणी देण्याची मागणी केली. त्यानुसार ज्या ठिकाणी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात आला आहे तेथे एक तास पाणीपुरवठा करावा, असे आदेश महापौरांनी दिले व महिलांनी माघार घेतली. सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू होते. 

नाथसागरात मुबलक पाणी आहे. केवळ महापालिकेचे नियोजन नसल्याने शहराला टंचाईचा सामना करावा लागत आहे. कुठे गरजेपेक्षा जास्त तर कुठे खूपच कमी पाणी मिळत आहे. पाणीपुरवठा विभागाने योग्य नियोजन केल्यास सर्वांना मुबलक पाणी मिळेल.
- सीताराम सुरे, नगरसेवक.

Web Title: Woman rally for Water